- वसंत भोईरवाडा : वारंवार मागणी करूनही वाडा तालुक्यातील उद्योगांना सरकारने सोयी-सुविधा न पुरवल्याने अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला असून ते गुजरात, वापी, दीव, दमणला स्थलांतरित झाले आहेत. याचा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला फटका बसला, तसेच स्थानिक कामगारही बेरोजगार झाले आहेत.
एकेकाळी भरभराटीला आलेल्या वाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला कामगारांच्या समस्यांनी ग्रासले आहे. खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, महागडी वीज या समस्या सुटत नसल्यानेही काही उद्योगांनी वारंवार दाद मागितली; पण त्यावर तोडगा निघाला नाही. उलट गुजरात आणि त्याला लागून असलेल्या परिसरात तुलनेने वीज स्वस्त आहे. रस्तेही चांगले आहेत. कामगारांचे प्रश्नही कमी असल्याने गेल्या दशकभरात अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला टाटा केला आहे.
हजारो कारखाने असूनही साधी अग्निशमन दलाची सोय नाही. एखाद्या कंपनीला आग लागली, तर त्यातील कोट्यवधींची साधनसामग्री जळत असल्याचे पाहण्यावाचून पर्याय उरत नाही. वाडा तालुका हा पालघर, भिवंडी येथील दोन खासदार आणि भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात विभागलेला आहे. त्यामुळे कोणत्याही एका लोकप्रतिनिधीचे या तालुक्याकडे लक्ष नाही. त्याचा फटका येथील विकासकामांना बसतो.
तालुक्याच्या दुर्गम भागात अजूनही रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचू शकलेले नाही. कोणत्याही निवडणुकांच्या काळात तोंड भरून आश्वासने दिली जातात. मात्र, नंतर काहीच पदरी पडत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पूर्वी हा मतदारसंघ डहाणू होता. आताच्या पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने ३० वर्षे, भाजपने पंधरा वर्षे, तर शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली. मात्र, या तिन्ही पक्षांना ठोस विकास करता आलेला नाही.
सिंचनाची समस्या, कारखानेही नाहीतवाडा तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. भाताच्या एकमेव पिकावरच अवलंबून राहावे लागते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे भाजीपाला, कडधान्य, फुलशेती करतात. तानसा, वैतरणा, पिंजर, गारगाई, देहर्जे या ५ बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यावर म्हणावे तेवढे बंधारे नसल्याने सिंचनाची समस्या कायम आहे.शेतीवर प्रक्रिया करणारा कारखाना न आल्याने वेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे बाजारपेठे शोधण्याचे आव्हानही उभे ठाकते.