कल्याण - डोंबिवली-विठलवाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिराने सुरु आहे. प्रवाशांच्या कामावर जाण्याच्यावेळेत मध्य रेल्वेने पुन्हा एकदा दगा दिला आहे. त्यामुळे नोकरदारांना आज नियोजित वेळेत ऑफीसला पोहोचता येणार नाही.
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना वारंवार असे अनुभव येत असतात. महत्वाचं म्हणजे ऐन गर्दीच्याचवेळी असे हाल होतात. कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी पेंटोग्राफ तुटला, कधी इंजिन बंद पडले तर कधी रेल्वे रुळाला तडे गेले यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते.
सकाळी 8.15 च्या सुमारास रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. आता रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे पण लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली असून संतप्त प्रवासी रेल्वेच्या नावाने बोट मोडत आहेत.