कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती व माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी सादर केलेले जात वैधता प्रमाण पत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. कोकण विभागीय जात पडताळणी समितीने वैजयंती गुजर घोलप यांच्या जात वैधता प्रमाणपत्रची वैधता पुन्हा तपासावी असे आदेश कोकण विभागीय जात वैधता समिताला उच्च न्यायालयाने दिले आहे. कोकण विभागीय समितीचा अहवाल येई पर्यंत वैजयंती गुजर घोलप यांचे नगरसेवक पद कायम राहणार आहे. 2015 साली पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून वैजयंती गुजर घोलप या चौथ्यांदा नगरसेविकापदी निवडून आल्या होत्या. त्यांच्या विरोधात भाजपा उमेदवार गौरक गुजर यांनी निवडणूक लढविली होती. गौरव गुजर यांचा पराभव झाला होता. वैजयंती या जातीने खाटीक आहेत. मात्र त्यांनी धनगर या जातीचा उल्लेख करुन ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्याच आधारे त्यांना महापौर पदही मिळाले होते. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रला आव्हान देणारी याचिका गौरव गुजर यानी उच्च न्यायालयात दाखल केली होती. माहितीच्या अधिकारात त्यांनी वैजयंती यांचे व्हिजिलन्स रिपोर्ट सरकारकडून मागविले होते. या रिपोर्टच्या आधारे उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान वैजयंती यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविले आहे. हे प्रमाणपत्र कोकण विभागीय जात पडताळणी समितीने दिले असल्याने समितीने पुन्हा त्याची तपासणी करावी, असे न्यायालयाने समितीला सूचित केले आहे. गौरव यांच्या मते वैजयंती यांनी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते. त्यालाही गौरव यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. जात वैधता प्रमाणपत्र पुन्हा तपासणी होईपर्यंत वैजयंती यांचे नगरसेवक पद कायम राहणार आहे. दरम्यान या संदर्भात वैजयंती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द, उच्च न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 5:39 PM