डोंबिवली: लॉकडाऊनंतर मीटर रीडिंग या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वीजबिलाच्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून ३० जूनपर्यंत ८ लाख ५ हजार लघुदाब ग्राहकांनी त्यांच्या २०७ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनीही आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
कल्याण परिमंडलात दहा दिवसांपासून सर्व कार्यालयांमध्ये अतिरिक्त काउंटर व मनुष्यबळ पुरवून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. तसेच ग्राहक शिबिरे, वेबिनारचे आयोजन, रहिवासी सोसायट्यांना भेटी देऊन वीजबिलाचे विश्लेषण समजून सांगण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संपर्क, 'एसएमएस, व्हॉटस अप मेसेज पाठवून बिलासंदर्भात माहिती देण्यात येत आहे.
जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत व वीजबिलाच्या विश्लेषणावर समाधान व्यक्त करत जून अखेरपर्यंत ८ लाख ५ हजार ६८० ग्राहकांनी त्यांचे २०७ कोटी रुपयांचे वीजबिल एकरकमी भरले आहे. उर्वरित ग्राहकांनी आपले वीजबिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे बुधवारी केले आहे.
गर्दी टाळण्यासाठी कूपनची व्यवस्था कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून तक्रारी घेऊन कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांसाठी कूपनची व्यवस्था करण्यात आली आहे. कूपनच्या माध्यमातून गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे सध्या विविध ठिकाणी भेटी देऊन लोकप्रतिनिधी, ग्राहक यांना तसेच कार्यालयात तक्रार घेऊन येणाऱ्यांना रीडिंगनंतर देण्यात आलेले वीजबिल कसे अचूक आहे, हे समजावून सांगण्यात व्यस्त आहेत.