शिवसेना आघाडीचे स्थायी समिती सदस्य नजरबंद, भाजपचा व्हीप जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:48 PM2020-10-28T17:48:38+5:302020-10-28T17:48:48+5:30
Ulhasnagar : शिवसेना आघाडीचे स्थायी समिती सदस्य नजरबंद, भाजपचा व्हीप जारी
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत बहुमत नसतांना शिवसेना आघाडीने महापौर, उपमहापौर पदे मिळविल्यानंतर, गुरुवारी होणाऱ्या स्थायी सभापती पदाच्या निवडणुकी साठी कंबर कसली आहे. भाजप स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक, अनुमोदक देऊन सभापती पदाच्या निवडणुक रिंगणात उतरविले. तसेच भाजपचे प्रकाश नाथानी यांना स्थायी समिती सदस्यांचा राजीनामा द्यायला सांगून शिवसेनेने विजय पाटील यांचा विजय निश्चित केला. तर भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी समिती सदस्यांना व्हीप जारी केला.
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक गुरुवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. समिती सदस्यांची पळवापळवी रोखण्यासाठी शिवसेना वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे -५, मित्र पक्ष असलेल्या रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे एकून ७ सदस्य शहराबाहेर एक हॉटेलात नजरबंद ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आघाडीचे सभापती पदाचे उमेदवार भाजपचे समिती सदस्य विजय पाटील हेही इतर सदस्या सोबत आहेत. एकूण १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी सामिती मध्ये भाजपचे-९, शिवसेना -५ तर रिपाइं-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यापैकी भाजपचे सदस्य असलेले विजय पाटील हे शिवसेना समर्थक सभापतींच्या रिंगणात उतरले असून भाजपचे दुसरे समिती सदस्य प्रकाश नाथानी यांनी मंगळवारी सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेना आघाडी बहुमतात आली असून पाटील यांचा विजय निश्चित आहे.
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर निवासणुकी दरम्यान बंडखोरी केल्याने, भाजपला महापौर पदाने हुलकावणी दिली. तर शिवसेना आघाडीचे महापौर, उपमहापौर निवडण आले. मात्र आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समिती सभापती पद भाजपकडे असल्याने , शिवसेना आघाडी नेत्यांची कोंडी झाली होती. महापालिकेची आर्थिक नाडी आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेने थेट सभापती पदासाठी इच्छुक असलेले भाजपाचे समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक , अनुमोदक देऊन निवडणूक रिंगणात उतरविले. तसेच दुसरे समिती सदस्य डॉ प्रकाश नाथानी यांना सदस्य पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. नाथानी याना राजीनामा देण्यासाठी स्वतः खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे महापौर यांच्याकडे घेऊन गेले होते.
चौकट
विजय पाटील यांच्या घराला व्हीप चिपकविला
महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकी साठी भाजपचे गटनेता व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी पक्षाच्या ८ स्थायी समिती सदस्यांना व्हीप जारी केला. पक्षाचे समिती सदस्य विजय पाटील हे शिवसेनेच्या समर्थनार्थ सभापती पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना ठाणे येथील एका हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहेत. भाजपने काढलेला पक्षव्हीप विजय पाटील यांच्या घराला चिपकविला असल्याची माहिती पक्षाचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वनी यांनी दिली।