महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:22+5:302021-09-26T04:43:22+5:30
ठाणे : महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण हाच महापालिकेतील प्रशासनाचा एकमेव उद्योग असल्याचा आरोप भाजपचे महापालिकेतील गटनेते मनाेहर डुंबरे यांनी ...
ठाणे : महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण हाच महापालिकेतील प्रशासनाचा एकमेव उद्योग असल्याचा आरोप भाजपचे महापालिकेतील गटनेते मनाेहर डुंबरे यांनी केला आहे. प्रशासनावर वचक ठेवण्यात महापालिकेतील सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही डुंबरे यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायम कृपादृष्टी ठेवली जात असल्याचा आरोपही डुंबरे करीत आहेत. कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर बदलीची कुऱ्हाड टाकली जाते. यापूर्वी कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांची मुदतीपूर्वी बदली केली हाेती. असे स्पष्ट करून अतिक्रमण विभागाच्या लक्षवेधी सूचनाही सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्याचे त्यांनी सांगितले. या विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाते. महिलांशी उद्दाम वागणाऱ्या सहायक आयुक्तावर मेहेरनजर, तर आता लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ. खुशबू टावरी यांना कारणे न देता सक्तीच्या रजेवर पाठविल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या डाॅक्टरने राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाची संगीतखुर्ची करण्यात येत आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्यासाठी वैजयंती देवगीकर यांना हटविले होते, असे त्यांच्याकडून ऐकवले जात आहे. आता डॉ. खुशबू टावरी यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका डुंबरे यांनी केली आहे.
कोविडकाळातील भ्रष्टाचारावर पांघरूण?
कोविड आपत्तीच्या काळात ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त होत आहे. या भ्रष्टाचाराला महिला अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याने व भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी महिला अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे का, अशी शंका गटनेते डुंबरे यांनी व्यक्त केली.