मध्य रेल्वे ठप्प झाल्याने नोकरदार घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:59 AM2020-09-24T00:59:29+5:302020-09-24T01:00:06+5:30
पावसामुळे बसला फटका : एसटी बस धावल्या रिकाम्या, लोकलच नसल्याने डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळी शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुंबई व उपनगरांत मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे रुळांमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानची लोकलसेवा बुधवारी कोलमडून पडली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना बुधवारी कामावर जाता आले नाही. सकाळी पावसाचा जोर कमी होत नसल्याने अत्यावश्यक सेवावगळता मुंबईतील अन्य कार्यालयांना सुटी देण्यात आली. दुसरीकडे सुरक्षिततेच्या कारणामुळे अनेकांनी प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केले.
पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वेने सकाळी लवकरच टिष्ट्वट करून प्रवाशांना दिली होती. शीव, मशीद आणि अन्यत्र सखल भागांमध्ये पाणी साचल्याने ठाणे-मुंबई सेवा बंद करण्यात आली. तसेच ठाणे-कल्याण, कसारा, कर्जत मार्गांवर अनिश्चित कालावधीत विशेष लोकल चालवण्यात आल्या. मात्र, त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. सकाळी नेहमीप्रमाणे डोंबिवली स्थानकात नोकरदार आले होते. मात्र, मुंबईकडे जाण्यसाठी लोकल नसल्याने त्यांनी घरची वाट धरली.
डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकातून खासगी कंपन्यांमधील कामगारांसाठी एसटी व अन्य महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस सुटतात. मात्र, बुधवारी त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने बस रिकाम्याच धावल्याचे दिसून आले. प्रवासी नसल्याने रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला. त्यामुळे पावसात ताटकळत राहण्यापेक्षा अनेक रिक्षाचालकांनी घरची वाट धरली. दुपारनंतर बाजारातही तुरळक गर्दी दिसून आली. व्यापाऱ्यांनी आवराआवर, हिशेबतपासणी करत दुकाने बंद केली.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम
च्मध्य रेल्वेने मनमाड येथून येणारी आणि मुंबईहून जाणारी विशेष एक्स्प्रेस रद्द केली. तसेच एलटीटी-गुवाहाटी आणि मुंबई-लखनऊ, मुंबई-बंगळुरू या विशेष गाड्यांचे वेळापत्रक रिशेड्युल केल्याची माहिती टिष्ट्वटद्वारे जाहीर केली.
च्मध्य रेल्वेच्या मध्यरात्रीपर्यंत ३५४ लोकलफेºया होतात. मात्र, मंगळवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे पहाटेपासून मुंबईत लोकल धावल्याच नाहीत, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे लोकल सुरू झाल्याच नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. बहुतांश विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द, वेळापत्रक बदलून चालवल्याचे सांगण्यात आले.