रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:19 AM2019-09-17T00:19:30+5:302019-09-17T00:19:38+5:30

कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली.

 Empty building gallery collapsed | रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली

रिकाम्या इमारतीची गॅलरी कोसळली

Next

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ मधील वसंत बहार येथील धोकादायक आणि रिकामी केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी कोसळली. या प्रकारानंतर महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीच्या शेजारील घरे आणि इमारतींतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. त्यामुळे २०-२५ कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.
वसंत बहार येथील रिकाम्या केलेल्या शेरावली इमारतीची गॅलरी सोमवारी दुपारी कोसळली. इमारत पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने महापालिका सहायक आयुक्त शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशान्वये इमारतीशेजारील घरे व इमारतीला नोटिसा दिल्या आहेत. काही घरे रिकामी केली. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीशेजारी कोणी जाऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात आले. दरम्यान, या धोकादायक इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीतील पुढच्या भागातील पाच-सहा, तर आजूबाजूच्या १५-२० घरांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात १३ इमारती रिकाम्या केल्या असून त्यापैकी महेक इमारत कोसळली, तर एका इमारतीचा स्लॅब कोसळला. काही इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या असून शेकडो कुटुंबे बेघर झाली.
आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी धोकादायक इमारती राज्य सरकारच्या २००६ च्या विशेष अध्यादेशानुसार नियमित करण्याचे तसेच ३० वर्षे जुन्या आणि धोकादायक इमारतीला चार चटईक्षेत्र देण्याची अधिसूचना काढली. शहरात धोकादायक व अतिधोकादायक इमारतीची संख्या २५० पेक्षा जास्त असून पुन्हा सर्वेक्षण केल्यास धोकादायक इमारतीची संख्या दामदुप्पट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय यापूर्वीच पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतल्याने अनेकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.
>आपत्कालीन पर्यायी व्यवस्था हवी
शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या महिन्यात १३ इमारती खाली केल्याने शेकडो कुटुंबे बेघर झाली. महापालिकेकडे तात्पुरते निवारा केंद्र व आपत्कालीन व्यवस्था नसल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना नातेवाईक अथवा भाड्याच्या घरात जावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने आपत्कालीन व्यवस्था उभी करण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Empty building gallery collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.