केडीएमसीतील प्रभाग अधिकाऱ्यांची अदलाबदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:43 AM2021-08-26T04:43:05+5:302021-08-26T04:43:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी मनपाचे ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी मनपाचे ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांची अन्यत्र बदली केली. रोकडे यांची तडकाफडकी झालेली बदली चर्चेचा विषय ठरली आहे. लेटलतिफ कर्मचाऱ्यांना दणका देण्यासाठी जुलैमध्ये दालनांना टाळे ठोकण्याची केलेली कारवाई त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या एकंदरीतच कारभाराविषयी आणि वर्तणुकीबाबतही वरिष्ठांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केल्याने रोकडे यांना अन्य कुठल्याही प्रभागाची जबाबदारी न देता त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी शिक्षण विभागात पाठविल्याची चर्चाही पालिका वर्तुळात आहे.
‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी मोकल यांची बदली मालमत्ता विभागात झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी मनपा मुख्यालयातील विद्युत विभागातील वरिष्ठ लिपिक सविता हिले यांच्याकडे सोपवली आहे. रोकडे यांनी फेब्रुवारी २०२१मध्ये ‘ग’ प्रभागाचा पदभार स्वीकारला होता. एक वर्षाचा कालावधीही उलटला नसताना तडकाफडकी झालेल्या बदलीने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दालनांना टाळे ठोकत जुलैमध्ये लेटलतिफ कर्मचाऱ्यांना रोकडे यांनी चांगलाच दणका दिला होता. दालनांची चावी घेऊन ते थेट नियोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला निघून गेले होते. दीड तासांनी ते पुन्हा कार्यालयात परतले होते. रोकडे यांच्या या कृतीवर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही मोजकेच कर्मचारी वेळेवर आलेले नसताना सर्वांनाच वेठीस का धरले, असा त्यांचा सवाल होता. संबंधितांना लेटमार्क अथवा कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक होते, परंतु टाळे ठोकून इतरांना त्रास का? याकडेही लक्ष वेधले होते.
उपायुक्त पल्लवी भागवत यांनीही रोकडे यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी घुमजाव करीत मी टाळे ठोकलेच नाही, अशी भूमिका तेव्हा घेतल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. हीच कारवाई रोकडे यांना भोवली आहे. मूळचे शिक्षण विभागात अधीक्षक असलेल्या रोकडे यांना पुन्हा त्याच विभागात पाठविले आहे. त्यांच्या जागी ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून ‘ब’ प्रभागात वरिष्ठ लिपिक असलेल्या रत्नप्रभा कांबळे यांची नेमणूक केली आहे. दरम्यान, या तडकाफडकी झालेल्या बदलीबाबत ‘लोकमत’ने रोकडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
‘क’ प्रभागाचा अतिरिक्त कारभार सावंत यांच्याकडे
‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे हे काही महिने रजेवर गेल्याने त्यांच्याकडील पदभार ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला आहे. त्यांनी ‘अ’ प्रभागाबरोबरच ‘क’ प्रभागाची जबाबदारी सांभाळायची आहे.
-----------------