भिवंडीत अवैध दारु विक्रेत्यांवर उत्पादन शुल्कची कारवाई: लाखोंचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:08 PM2017-12-21T23:08:30+5:302017-12-21T23:13:19+5:30
नाताळ आणि थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडीतील अवैध दारु विक्रीवर कारवाई करुन चार वाहने जप्त केली.
ठाणे: गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक आणि विक्री करणा-या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने गुरुवारी अटक केली. या कारवाईत चार वाहनांसह सुमारे नऊ लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भिवंडीतील अंजूर माणकोली रोडवर बेकायदेशीरपणे गावठी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड, उपनिरीक्षक दिलीप शिर्के आणि रविंद्र पाटणे यांच्या पथकाने २१ डिसेंबर रोजी दुपारी अंजूर, माणकोली रोड येथून गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारी एक रिक्षा, दोन कार आणि एक दुचाकी अशी चार वाहने जप्त केली. या वाहनांमध्ये रबरी टयूबमधून दारुची वाहतूक करुन तिची विक्री केली जात होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली तर त्यांचे अन्य दोन साथीदार मात्र पसार झाले. त्यांच्याकडून एक हजार ८० लीटर गावठी दारु, तीन वेगवेगळया आकारांच्या रबरी टयूब आणि चार वाहने असा आठ लाख ९३ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या समारास करण्यात आली. दारुची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.