कारखान्यांची झाडाझडती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:24 AM2019-09-04T01:24:12+5:302019-09-04T01:24:23+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘रासायनिक बॉम्ब’ : ११ एमआयडीसींसह बेकायदा गोदामांचे जाळे
सुरेश लोखंडे
ठाणे : उरण येथे वायुगळतीमुळे मंगळवारी लागलेली आग, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडीच्या कारखान्यास लागलेली आग. या घटनांवरून धडा घेऊन ठाणे जिल्ह्यातील धोकादायक केमिकल्स वापरणाऱ्या औद्योगिक पट्ट्यातील, शेकडो कारखाने, फॅक्टरी, गोडाउन यांची ‘स्थळ पाहणी अहवाल’ करून आडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. उपरोक्त आगींसह भिवंडीतील गोदामपट्ट्यांत लागलेल्या गेल्या काही दिवसांतील आगीच्या दुर्घटना पाहता याची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा औद्यागिक पट्टा ठाणे जिल्ह्यात आहे. सुमारे ११ एमआयडीसी क्षेत्रांसह जागतिक दर्जाच्या ट्रान्स ठाणे क्रीक (टीटीसी) हा औद्योगिक पट्ट्यात जीवघेणे केमिकल्स रोज वापरले जात आहे. याशिवाय परदेशातील उत्पादकांच्या साठवणुकीसाठी मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी पट्ट्यात अनधिकृत गोडाउनचे जाळे असून त्यातील विनापरवाना ठेवल्या जाणाºया रासायनिक स्पोटकांमुळे लागणाºया आगी व औद्योगिक पट्ट्यातील वायुगळती जीवितास घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण करणारी खास आपत्ती प्रतिबंधक यंत्रणा जिल्ह्यात सक्षम करण्याची अत्यंत गरज आहे.तत्पूर्वी या ठिकाणाचा स्थळ पाहणी अहवाल काळजीने करून त्याची अंमलबजावणी सक्तीने करण्यास भाग पाडण्याची गरज निर्माण झाली आहे.
१९३ गोदामांमध्ये रासायनिक विस्फोटके
या अनधिकृत गोदामांमध्ये सर्वाधिक आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी अवघ्या आठ महिन्यात ८३ दुर्घटना होऊन ४८ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी शेकडो आगीच्या व वायुगळतीच्या घटना घडूनही त्या गुलदस्त्यात आहेत. महामार्गालगतच्या भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी गावांजवळ शेकडो गोडाउन आहेत. त्यातील बहुतांशी अनधिकृत आहेत. कांदळवन नष्ट करून सुमारे १०० गोडाऊनची यादी प्रशासनाच्या हाती आहेत. या गोडाऊन पट्ट्यात १९३ गोडाउनमध्ये बिनदिक्कत रासायनिक विस्फोटकांचा साठा होत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात केवळ चार गोदाममालकांकडे परवाना असल्याचेही सांगितले जाते. याव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी विस्फोटकांचा साठा होत असल्याचा संशय आहे. या अशा ठिकाणांचा कारखान्यांचा, फॅक्टरीज आदींचा शोध घेऊन त्यांना परवानगी मिळालेले केमिकल व त्यांच्याकडून बेकायदेशीर वापरले जाणाºया केमिकलचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. याशिवाय सरकारी यंत्रणांकडून स्पॉट आॅडिट करून त्यांनुसार सक्तीची अंमलबजावणीची गरज सध्या आहे.
येथे लागल्या आहेत आगी
या आधी रासायनिक दुर्घनांमध्ये अंबरनाथ येथील फॉरेस्टनाक्या जवळील केमिकल कंपनीची दुर्घटना,घोडबंदर रोडवर केमिकलने भरलेले बीपीसीएलचे टँकर, भिवंडीचे जयश्री कम्पाउंडची केमिकलचे गोदाम,नारपोलीची डार्इंग मशीन आग, सुधीर शेट केमिकल्स कंपनीची आग, मानकोलीच्या इंडियन कॉर्पोरेशन कंपनीच्या गोदामची आग, ओवळी येथील गोदामाची आग, तुर्भेतील केमिकल कंपनी, उल्हासनगरची फर्निचर कंपनी, भिवंडीचे वळपाडासह काल्हेर, सोनाळे येथील गोडाउन, कृष्णा कम्पाउंड, कृपा इंडस्टीज, पडघा येथील गवत, मानकोली, ऐरोली आदी ठिकाणी आगीच्या घटना आणि गेल्या काही दिवसांपूर्वी याच भिवंडीतील कारखान्यास लागलेली आग आदी घटना दुर्लक्षित व निष्काळीपणातून झालेल्या दिसून येत असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.