ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या भरतीमध्ये लेखी परीक्षेत परीक्षार्थीऐवजी कॉपी करणाºया विकास जौनवाल (रा. औरंगाबाद) या तोतया परीक्षार्थीला अटक केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी रविवारी दिली. कॉपीसाठी त्याने वापरलेला मोबाईल, काळया रंगाचे ब्ल्यू टूथ डिव्हाईस कनेक्टर आणि मिनि इयर बड त्याच्याकडून हप्त केले आहे. मुळ परीक्षार्थी आणि त्याचा साथीदार बालाजी कुसळकर याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राबोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ एप्रिल २०२३ रोजी राबोडीतील परीक्षा केंद्र क्रमांक ९ सरस्वती विद्यालय येथे पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येत होती. या परिक्षेसाठी उमेदवारांची शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तपासणी करण्यात येत होती. ही तपासणी सुरु असतांनाच एक परीक्षार्थी उमेदवार त्याच्या पायाच्या आणि गुडघ्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या नि कॅप च्या आत इलेक्ट्रॉनिक वॉच तसेच एक ब्ल्यू टूथशी कनेक्टेड असलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तसेच सहज निदर्शनास येणार नाही असे, कानात एक अतिसूक्ष्म ब्ल्यूटूथ आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना तिथे बेदोबस्तावर असलेले पोलिस हवालदार ईश्वर घोलवड यांनी या उमेदवाराची तपासणी करतांना त्यांना त्या वस्तू त्याच्या शरीरावर असल्याचे आढळले. बाजूला घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव विकास भवरसिंग जौनवाल (रा. बेंबळ्याची वाडी, पोस्ट कचनेर , तालुका जिल्हा औरंगाबाद ) असे सांगितले. त्याला आणखी बोलते केल्यानंतर मुळ परीक्षार्थी बालाजी बाबू कुसळकर (रा. बीड, चेस्ट क्रमांक १६८९२) याच्याऐवजी लेखी परीक्षा देण्यासाठी आल्याचे त्याने कबूल केले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यासह बालाजी कुसळकर याच्याविरुद्ध राबोडी पोलिस ठाण्यात कलम ४१९, ३४ सह महाराष्टÑ पिव्हेंशन आॅफ मलप्रॅक्टीसेस अॅक्ट युनिव्हर्सिटी, बोर्ड अॅन्ड अदर स्पेसिफाईड एक्झामिनिशेन अॅक्ट १९८२ चे कलम सात प्रमाणे दुपारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पोलिस भरतीसाठीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तोतया विकास जौनवाल याला अटक केली आहे. आता मुळ उमेदवाराचाही शोध घेण्यात येत आहे.गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर