ठाणे : अभिनय कट्टा क्रमांक ४२९ म्हणजे नवरा-बायको, आई-वडील-मुलगा, सासू-सून, आजी-नातू, बहीण-भाऊ ह्या नात्यांच सेलिब्रेशन.धावत्या युगात एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत असताना अमित आणि मेघनाच्या एका गोड गोजिऱ्या कुटुंबाची धम्माल गोष्ट म्हणजे 'घर असावे घरासारखे'.तांत्रीक युगात सगळं काही तात्पुरत्या स्वरूपात झालं असताना देसाई कुटुंबातील चिरतरुण असलेल्या नात्याची धम्माल म्हणजे 'घर असावे घरासारखे'.
अभिनय कट्टा ४२९वर खरोखरच कौटुंबिक स्नेहाचा नाट्याविष्कार सादर झाला, निमित्त होत अभिनय कट्ट्याचा कलाकार अभिषेक जाधव लिखित दिग्दर्शित एकांकिका 'घर असावे घरासारखे'च सादरीकरण. अमित आणि मेघना ह्यांचा संसार धम्माल चालू असताना अमितचे वडील पुरुषोत्तम देसाई आणि आई शारदा , अमितची बहीण वैशाली आणि त्यांची लाडकी आजी ह्यांची साथ मिळत असते.परंतु अमितचे वडील त्यांच्या लग्नाचा वाढदिवस विसरल्यामुळे घरात जी धम्माल उडते त्यांचं सादरीकरण म्हणजे 'घर असावे घरासारखे'.विसराळू बाबांना धडा शिकवायची सर्व तयारी करतात परंतु 'बाप खरच बाप असतो' ह्यावर पुरुषोत्तम देसाई हे वाढदिवस विसरल्याच फक्त नाटक करत असून त्यांनी बायकोला सरप्राईज द्यायची पूर्ण तयारी केलेली असते हे उघडकीस येऊन शेवट गोड होतो ह्या संपुर्ण कथानकाचं धम्माल नाट्यमय सादरीकरण अभिनय कट्ट्यावर निखळ मनोरंजनाचं कारण ठरलं. सदर एकांकिकेत अमितची भुमिका 'अभिषेक जाधव', मेघनाची भूमिका 'सई कदम', पुरुषोत्तम देसाईची भूमिका 'सहदेव कोळम्बकर', आई शारदा देसाई 'आरती ताथवडकर', आर जे बनण्याचं वेड असणाऱ्या बहिणीची भूमिका 'न्यूतन लंके', आजीची भूमिका 'रुक्मिणी कदम', बिल घ्यायला आलेल्या दुधवाल्याची भूमिका 'कुंदन भोसले' , अमितचा धम्माल मित्र परशुरामची भूमिका 'आदित्य नाकती' आणि शेवट गोड करणाऱ्या सरप्राइज गिफ्ट घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉय ची भूमिका 'अतिष जगताप' ह्यांनी साकार केली.प्रत्येक भूमिका प्रत्येक घटना प्रेक्षकांना जवळची वाटून गेली. सदर एकांकिकेचं संगीत साक्षी महाडिक आणि प्रकाशयोजना ओंकार मराठे ह्यांनी केली.तसेच नेपथ्य सहदेव साळकर व महेश झिरपे ह्यांनी सांभाळलं.
प्रदीर्घ आजारावर मात करीत स्वतःच्या पायावर उभा राहणारा अभिषेक हा आम्हा कट्टेकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एक वर्षापूर्वी अतिदक्षता विभागात नाजूक परिस्थितीत असलेल्या अभिषेकची जिवंत रहाण्याची अजिबात आशा नसताना केवळ अभिनय कट्ट्याची ओढ व कट्टयावर पुन्हा सादरीकरण करण्याची इच्छा , आई, वडील व भावाने घेतलेली मेहनत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किरण नाकती यांनी अभिषेकला दिलेल्या आत्मविश्वासाची जोड यामुळेच अभिषेक पुन्हा एकदा उभा राहिला आणि आठ महिन्याआधी त्याने सादर केलेली एकांकिका बघायला त्याचे डॉकटर आले होते त्यांचे उदगार की कालचा माझा पेशन्ट आजचा माझा हिरो झाला, बरंच काही सांगून गेले. याच अभिषेकने लिहिलेली व दिग्दर्शित केलेली एकांकिका म्हणजे घर असावे घरासारखे. अभिषेकचं लिखाण खूप जवळच वाटतं आणि कथानकाची मांडणी ही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी अलगद साम्य दर्शवून जाते.त्याने स्वतः लिहलेली आणि दिग्दर्शन केलेली एकांकिका स्वतः संपूर्ण टीमला एकत्र घेऊन सादर करणारा अभिषेक हा अभिनय कट्ट्याच्या खरोखरच बाजीगर आहे.यापुढेही अभिषेक विविध कलाकृतीतून सशक्तपणे प्रेक्षकांसमोर येत राहील आणि आपल्याला आनंद देत राहील असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केलें. कट्ट्याच्या या अभिषेकच्या जन्मदिवसानिमित्त अभिनय कट्ट्यातर्फे या एकांकिकेचा प्रयोग सादर करण्याची संधी देऊन अभिनय कट्टयासोबत उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांनी अभिषेकच्या जिद्दीला सलाम करीत जन्मदिवस साजरा केला. सदर कार्यक्रमाचे निवेदन कदिर शेख ह्यांनी केले.