ठाणे : कोरोनाच्या सावटाखाली अतिशय साध्या पद्धतीने यंदा दीड, पाच, सहा आणि सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर आता ११ दिवसांच्या बाप्पाचेही तसेच विसर्जन व्हावे, यासाठी महापालिकांसह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात ३० हजार ९१९ खाजगी आणि ३६४ सार्वजनिक गणरायाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात काढण्यात येणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना राज्य सरकारने घातलेली बंदी, रद्द झालेले काही सार्वजनिक गणेशोत्सव तसेच महापालिकांच्या ‘विसर्जन आपल्या दारी’ या संकल्पनेमुळे पोलिसांचा ताण हलका झाल्याचे दिसले.विसर्जनासाठी जिल्ह्यातील विविध महापालिकांनी घरच्या घरी गणेशमूर्ती कशा विसर्जन करता येतील, याची माहिती दिली आहे. तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पनाही आणली आहे. यात महापालिकेचे वाहन येऊन गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणार आहे. तर, काही गृहसंकुलांनी त्यांच्या संकुलात विसर्जन हौद तयार केले आहेत. त्यामुळे विसर्जन काळातही कृत्रिम तलाव, गणेश विसर्जन घाट येथील गर्दी कमी असणार आहे.असे असले तरी खबरदारी म्हणून विसर्जन मिरवणुका निघणार नाहीत, याकडे पोलिसांची नजर असणार आहे. तसेच विसर्जन घाट, कृत्रिम तलाव येथेही विविध ३५ पोलीस ठाण्यातील पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. यासह एक शीघ्रकृती दलाची कंपनी, राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तसेच एक बॉम्बशोधक पथकही असणार आहे. हे पथक ठिकठिकाणी तपासणी करणार आहे.१३ कृत्रिम तलाव, ७ विसर्जन घाटठाणे : लाडक्या गणरायाचे विसर्जन करता येणे सोपे व्हावे, यासाठी ठाणे महापालिकेने शहरात १३ कृत्रिम तलावांसह सात ठिकाणी विसर्जन घाटांची सोय केली आहे. याशिवाय, २० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था असणार आहे.
आज ३१,२८३ बाप्पांना निरोप, ठाणे जिल्ह्यात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 3:18 AM