- अजित मांडकेठाणे : कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक ठिकाणी वजन वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, ठाण्यात याउलट झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी ठाण्यातील सुमारे ३५० हून अधिक कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वजन कसे वाढवायचे याबाबतचे उपायही त्यांनी सांगण्यात येत असून, त्याचा फायदाही झाल्याचे अनेकांनी सांगितले.शहरात ५८ हजार ८९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत ५६५८७ रुग्णांनी त्यावर मात केली आहे, तर एक हजार ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामध्येही तीव्र लक्षणे, मध्यम व सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. ७५ किलोवरून वजन ६५ किलो मला कोरोनाची लागण झाली त्यावेळेस माझे वजन साधारणपणो ७५ किलोच्या आसपास होते; परंतु मला उपचारासाठी रुग्णालयात १५ दिवस राहावे लागले. या काळात माझी प्रकृती सुधारली, मात्र वजन तब्बल १० किलो कमी झाले. त्यामुळे मला जास्तीचे टेन्शन आले होते. त्यामुळे आता पुन्हा वजन वाढविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर काम करीत आहे, असे अजित खेडेकर यांनी सांगितले.ज्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत किंवा ज्यांना कोरोनामुळे १० दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात राहावे लागले आहे, अशांच्या वजनात कमालीची घट झाली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांचे वजन ५ ते १० किलोने कमी झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे काही रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. झपाट्याने वजन कमी हाेत असल्याने काहींना नैराश्यानेही गाठले हाेते. त्यातच अशक्तपणाही कमालीचा वाढला हाेता. त्यामुळे अनेकांना काय करावे हेच सुचत नव्हते. काहींनी वैद्यकीय सल्ला घेतला तर काहींनी घरगुती उपाय करून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला. व्यायामाशिवाय फक्त आरामज्यांचे कोरोनानंतर वजन कमी झाले असेल त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियमित व्यायाम करून पुरेशी झोप घ्यावी. शिवाय यासाठी पोषक आणि पूरक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वजन वाढण्यास निश्चित मदत होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.या रुग्णांनी महापालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन यामागची कारणे मागितली आहेत. तसेच वजन वाढविण्यासाठी कोणकोणते उपाय करणे गरजेचे आहे, याचीही माहिती घेतली आहे. वजन कमी झालेल्यांच्या ३५० हून अधिक तक्रारी पालिकेच्या पोस्ट कोविड सेंटरमध्ये मिळाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे त्यांचे मत परिवर्तन करणे, त्यांच्यातील भीती दूर करणे, वजन वाढविण्यासाठी उपायांची माहिती दिली जात आहे. ज्यांना रुग्णालयात उपचारासाठी १० ते २० दिवस राहावे लागले, अशा रुग्णांचे निश्चितच वजन कमी झाले आहे. या काळात तोंडाला चव नसणे, खाण्याची इच्छा नसणे आणि मनात निर्माण झालेल्या भीतीमुळेही अनेकांचे वजन कमी झालेले आहे; परंतु कोरोनावर मात केल्यानंतर आहार घेतल्यानंतर आणि रोजच्या रोज व्यायाम केल्याने वजन वाढण्यास मदत होत आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय
कोरोनानंतर रुग्णांच्या वजनात कमालीची घट झाल्याने भीती, ३५० जणांनी जाणून घेतली कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 12:41 AM