उल्हासनगर : सरकारच्या धोरणानुसार शहरातील फेरिवाल्यांचे ३१ ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणानंतर त्यांना ओळखपत्र देऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त विकास चव्हाण यांनी शनिवारी केंद्राच्या उद्घाटन वेळी दिली.
उल्हासनगर पालिकेने दीड ते दोन वर्षापूर्वी फेरिवाल्यांचे सर्वेक्षण व नोंदणी केली होती. मात्र त्यानंतर काय झाले, याचा थांगपत्ता फेरिवाल्यांना लागला नाही. सरकारी निर्णयानुसार पुन्हा फेरिवाल्यांचे सर्वेक्षण सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणार असून त्यांच्यावर महापालिकेचा अंकुश राहणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मोबाइल अॅपद्बारे सर्वेक्षण होऊन त्यांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यानंतर त्यांंची जागा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची संकल्पना असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सत्यवान जगताप यांनी दिली. यावेळी फेरिवाला संघटनेचे पदाधिकारी व फेरिवाले उपस्थित होते.