मेट्रो कारशेडचे काम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:53 AM2021-02-27T04:53:56+5:302021-02-27T04:53:56+5:30
ठाणे : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घोडबंदर भागातील मोघरपाडा येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो कारशेडचे काम पुन्हा एकदा सुरू ...
ठाणे : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घोडबंदर भागातील मोघरपाडा येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो कारशेडचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन एमएमआरडीएच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आधी पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता हे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
मागील दोन वर्षांपासून हा वाद सुरू आहे. आता तो आणखी वाढणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मोघरपाडा येथे १९६० सालापासून कसत असलेल्या शेतक-यांच्या जमिनी असून मेट्राे कारशेडसाठी ही जमीन एमएमआरडीएला हवी आहे. परंतु, येथील जमिनीवर भातपिकाचे उत्पन्न होत असून अनेक शेतकरी कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-यांच्या दृष्टीने निर्णय घेताना बैठक घेण्यात यावी, अशी मागणीदेखील केली होती. परंतु, ज्या पद्धतीने गोरेगावच्या आरे कारशेडची व कांजूरमार्गच्या प्रस्तावित कारशेडच्या जमिनीच्या मालकीबाबतीत या अधिका-यांनी गोंधळ घातला, तसाच गोंधळ हा कासारवडवली-वडाळा मेट्रो कारशेडच्या बाबतीत एमएमआरडीएचे अधिकारी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शेतकरी कसत असलेल्या या जमिनीच्या मोजणीसाठी एमएमआरडीएने जिल्हाधिका-यांच्या मदतीने दोन ते तीन वेळा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक भूमिपुत्रांनी तो हाणून पाडला, असे असतानाही एसी कार्यालयात बसून नकाशे रंगवण्याचे काम करणा-या काही वरिष्ठ अधिका-यांनी आता जमीनमालकी व ताब्यात नसतानाही मेट्रो कारशेडचा घाट घातला. त्यामुळे शेतक-यांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात न घेता मोघरपाडा कारशेड हे प्रकरणसुद्धा आरे व कांजूरमार्गसारखे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा अधिका-यांवर गुन्हे दाखल करावेत, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.