ठाणे - जमिनीप्रकरणी दहा लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे तहसीलदार किसन भदाणे यांना संबंधित फाईलची आडवणूक करू नका, अशी समज एका राजकीय वरिष्ठ नेत्याने दिली होती; मात्र त्यास न जुमानता मनमानी केल्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात भदाणे अडकल्याची चर्चा ठाणे तहसीलदार कार्यालय परिसरात ऐकायला मिळत आहे.दिवाळीच्या धनत्रयोदशीला संध्याकाळी कार्यालयात दहा लाखांच्या लाचप्रकरणी भदाणेंना अटक केली आहे. त्यांच्या पोलिस कस्टडीचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे २४ आॅक्टोबर रोजी त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दरम्यान भदाणे यांच्या निवासासह गावाकडील घरावरदेखील पोलिसांनी छापे मारून मालमत्तेचा आंदाज घेतला आहे. वाहनचालकाचे नाव घेऊन भदाणे बचाव करीत आहेत. मात्र विशेष न्यायालय काय निर्णय देणार त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहेत.मंत्रालयासह ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त ड्रायफ्रूट व गिफ्ट वाटून भदाणे संध्याकाळी कार्यालयात येऊन बसले. अधिक वेळ न बसता त्वरीत कार्यालय सोडून घरी जाण्याविषयी काही कर्मचाºयांनी त्यांना सूचित केल्याचे सांगितले जात आहे; पण त्यास न जुमानता उशिरापर्यंत बसलेले भदाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला बळी पडले. वरिष्ठांच्या आदेशासही न जुमानता आपल्या पद्धतीने कामांची हाताळणी करीत असत. विकासकांशीदेखील त्यांचे चांगले - वाईट लागेबांधे असल्याचे सांगितले जात आहे. वसई येथे असतानाही त्यांची कारकीर्द संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे.मीरा-भार्इंदर परिसरातील काशीगाव क्षेत्रातील जमीन विकासित करण्यासंदर्भातही फाईल अडवून ठेवल्यामुळे भदाणेची अडचण झाली आहे. राजकीय क्षेत्रातील बलाढ्य व वरिष्ठ नेत्यांच्या भ्रमणध्वनीवरील सल्ल्यासही भदाणे यांनी जुमानले नाही. राजकीय नेतृत्वाचाही विचार न करणे भदाणे सामान्य व्यक्तींतींचे तर ऐकूनही घेत नसल्याचे बोलले जात आहे. मोबाइल टॉवरवरील कारवाईतही त्यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी केल्याचा आरोप होत आहे. ‘एनए’ प्रकरणात तर ते ऐकूनच घेत नसल्याची चर्चा आहे. झोपडपट्ट्यांवरील कारवाई असो की सोयासटींचा भूखंड, सोसायटीला कर लावल्यानंतरही त्यातील नर्सिंग होमलादेखील वेगळ्या करात आडकवल्याच्या तक्रारी भदाणे यांच्या विरोधात ऐकायला मिळत आहे.
फाईल आडवणे ठाणे तहसीलदारांना भोवले ! राजकीय नेत्याने दिली होती समज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 8:59 PM