लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : काशीमीरा भागातील पालिका उद्यानाच्या आरक्षणात झालेल्या सुमारे ३०० बेकायदा बांधकामांवर २७ ऑगस्ट रोजी तोडक कारवाई केली होती. महापालिकेने तक्रार केल्यावर ८ दिवसांनी चाळ माफियांसह संबंधित बांधकामधारक, भोगवटादार रहिवासी, आदींवर गुन्हा नोंदवला आहे.
जरीमरी मार्गावरील महापालिका उद्यानाच्या आरक्षणात झालेल्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने २७ ऑगस्ट रोजी तोडक कारवाई केली होती. विकसकास टीडीआर देण्यासाठी पालिकेने कोरोना संसर्ग काळात उच्च न्यायालयाचे आदेश डावलून कारवाई केल्याचे आरोप झाले होते. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांचा हा प्रभाग असल्याने यांच्यासह सत्ताधारी भाजपसुद्धा अडचणीत आला. महापौरांसह काही नगरसेवकांनी बेकायदा बांधकामांचे खापर पालिका अधिकाऱ्यांवर फोडले.
दरम्यान, कारवाईच्या ८ दिवसांनंतर प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांनी शनिवार, ४ सप्टेंबर रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. मनोज चोहान, प्रेम चोहान, दीपक पासवान, गुलाम शेख, विलास राऊत यांसह इतर विकसक, बांधकामधारक, भोगवटाधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील राऊत हा शिवसेनेचा माजी पदाधिकारी असल्याचे सांगण्यात आले.