मीरा रोड : वरसावेनाका येथील काशिमीरा पोलीस चौकीसमोर असलेल्या एक्स्प्रेस इन हॉटेलच्या मागील भागातील नैसर्गिक कांदळवन-पाणथळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव होत आहे. उच्च न्यायालयाचे आदेश व कायद्याचे सर्रास उल्लंघन करून पर्यावरणाचा ºहास केला जात असताना पालिका, पोलिसांसह महसूल विभागास मात्र याचा गंध नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.वरसावेनाका हा अत्यंत वर्दळीचा असून येथे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर मार्गाचा नाका आहे. त्यामुळे काशिमीरा पोलिसांची येथे पोलीस चौकी असून वाहतूक पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात असतात. याच नाक्यासमोर असलेल्या एक्स्प्रेस इन, शेल्टर आदी हॉटेलमागे कांदळवन आणि पाणथळ आहे. शिवाय, हा परिसर सीआरझेडमध्ये मोडतो.याआधी कांदळवनात भराव करून पटेल कम्पाउंड व काठीवाडी ढाबा, होर्डिंग आदी बांधकामे झाली आहेत. तर, सीएनरॉक हॉटेलसाठी कांदळवनात रस्ता बनवण्यात आला आहे. या तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल असून अन्य तक्रारी प्रलंबित आहेत. तर, झालेला बेकायदा भराव व बांधकामे तोडण्याची कार्यवाही अजूनही महापालिका करत नाही. भरतीचे महामार्गाखालून येणारे पाणी भराव-बांधकाम करून अडवण्यात आले आहे. पाण्याचा मार्ग खुला करण्यासह कांदळवनाची लागवड केली जात नाही.एकूणच, हा परिसर संवेदनशील असतानाही पालिका आणि सरकारी यंत्रणांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत असतानाच काही दिवसांत एक्स्प्रेस इन हॉटेलमागील कांदळवनात सर्रास मातीचा भराव सुरू करण्यात आला आहे. भराव करणारे डम्पर सातत्याने सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून जेसीबीने समतोल करत भूखंड तयार करण्यात आला आहे. आधी दाखल झालेले गुन्हे व संवेदनशील परिसर असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात कांदळवनात चाललेल्या या भरावाकडे पोलिसांपासून पालिका आणि महसूल विभागाने कानाडोळा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.मीरा-भार्इंदरमध्ये कांदळवन नष्ट करून मातीचा भराव करत भूखंड बांधकामांसाठी खुले करण्याचे कारस्थान स्थानिक पालिका व सरकारी यंत्रणांसह काही बिल्डर आणि राजकारणी करत आहेत. वरिष्ठ अधिकारीही अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळेच या पर्यावरणद्रोही माफियांना मोकळीक देण्यात आली आहे.- स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्तीएक्स्प्रेस इन हॉटेलमागे मातीचा भराव करून कांदळवनाचा ºहास होत असल्याबद्दल विभागीय पोलीस उपअधीक्षक यांना कारवाईचे निर्देश दिले आहे. - डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीणकांदळवनात भराव सुरू असल्याचे कळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.- अधिक पाटील,तहसीलदार, ठाणे
कांदळवनात माफियांकडून मातीचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:13 AM