अखेर अपघातग्रस्त ब्लेसिंग धक्याजवळ आणण्यात मच्छिमारांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 06:34 PM2017-09-21T18:34:58+5:302017-09-21T18:35:16+5:30
१९ सप्टेंबरला मुसळधार पावसासह समुद्रात आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रात्री ८.३० वाजताच्या सुमारास समुद्रातील रेती सदृश छोट्या बेटावर चढुन पलटी झाली.
- राजू काळे
भार्इंदर, दि. 21 - १९ सप्टेंबरला मुसळधार पावसासह समुद्रात आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रात्री ८.३० वाजताच्या सुमारास समुद्रातील रेती सदृश छोट्या बेटावर चढुन पलटी झाली. तीला अखेर २१ सप्टेंबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास धक्यालगत आणण्यात मच्छिमारांना यश आले.
१९ सप्टेंबरला सुरु झालेल्या वा-यासह मुसळधार पावसामुळे ही बोट उत्तन किना-यावरील नवी खाडी येथून चौक धक्यालगत सुरक्षित नांगरण्यासाठी जात होती. परंतु, जोरदार वादळी पावसामुळे बोटीचा तांडेल निलेश डिमेकर याला समुद्रातील रेती सदृश छोटे बेट न दिसल्याने त्या बेटावर बोट चढुन ती पलटी झाली. समुद्राला उधाण आल्याने तीला किना-यावर घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यातील खलाशांनी उत्तन किना-यावरील मच्छिमारांना संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच बोटीतील प्लास्टिकच्या कॅनद्वारे समुद्रात उड्या घेतल्या. पाण्याच्या प्रवाहामुळे ते वसई समुद्र किनारी जाऊ लागले. तेथील बॉबीलोन बोटीतील खलाशांनी त्यांना बोटीत घेतले. दरम्यान ती बोट किना-यावर नेण्यास खलाशांनी संपर्क साधलेले मच्छिमार त्या बेटालगत आले. परंतु, समुद्राला ओहोटी येण्यास सुरुवात झाल्याने त्यांना बोट आणण्यात अपयश आले. दुस-या दिवशी सकाळी ६ वाजता मिशन ब्लेसिंग सुरु झाले. तत्पुर्वी भरती सुरु झाल्याने बोटीत पाणी व माती साठू लागली. त्यातच ती पुर्णपणे उलटी होऊन समुद्रात बुडु लागली. परंतु, मच्छिमारांनी तीला वाचविण्यात यश मिळवुन चौक येथे आणण्याचा प्रयत्न केला. दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु असलेला हा प्रयत्न पुन्हा ओहोटीमुळे अर्धवट राहिला. त्यामुळे ब्लेसिंगला तेथील बोटींना दोरखंडाने बांधुन ठेवण्यात आले. २१ सप्टेंबरला पुन्हा सकाळी ६ वाजता मिशन ब्लेसिंग सुरु करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजता तीला जेसीबी व अग्निशमन दलाच्या मदतीने चौक धक्यालगत सुरक्षित स्थळी आणण्यात मच्छिमारांना यश आले. या अपघातात बोटीचे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले असुन त्यात बोटीतील मासळी साठविण्याचे कोल्ड स्टोरेज, कॅप्टनच्या केबिनचे पुर्णपणे नुकसान झाले. तसेच इंजिनही नादुरुस्त होऊन मासळीच्या जाळ्याचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले. सुदैवाने या अपघातात बोट मात्र फुटली नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळल्याचे स्थानिक मच्छिमार अजित गंडोळी यांनी सांगितले.