- सुरेश लोखंडे ठाणे - कोकणातील ठाणे जिल्हा परिषदेसह पालघर, रायगड, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. आॅनलाइन झालेल्या या बदल्यांनंतर नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेशही संबंधित शिक्षकांना प्राप्त झाले. मात्र, आचारसंहितेमुळे ते रखडले होते. तरीदेखील, १२ मे च्या सुटीच्या आधी या शिक्षकांनी त्यांच्या नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेश गुरुवारी कोकणभवनला झालेल्या बैठकीत कोकण विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार, त्यांना ६ मे पासून सध्याच्या शाळेतून कार्यमुक्त करून ७ मे ला बदली झालेल्या शाळेवर हजर होण्यास सांगितले आहे.ठाणे जिल्ह्यातील दोन हजार ११९ शिक्षकांसह कोकणातील उर्वरित चार जिल्हा परिषदांच्या हजारो शिक्षकांच्या सुमारे दीड महिन्यापूर्वी आॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यांचे आदेशही संबंधित शिक्षकांना मिळालेले आहेत.महाराष्टÑ दिनानंतर म्हणजे २ मे पासून या शिक्षकांना नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेश होते. या शैक्षणिक वर्षातच बदली झालेल्या शाळेवर या शिक्षकांना हजर व्हावे लागणार होते. तसे आदेशही शिक्षकांना मिळालेले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या आदेशाला स्थगिती मिळाली होती. परंतु, आता कोकणातील या जिल्ह्यांमधील लोकसभेच्या निवडणुका चौथ्या टप्प्यात नुकत्याच पार पडल्या आहेत. यामुळे २३ मे च्या मतमोजणीनंतर शिक्षकांना शाळांवर हजर व्हावे लागणार होते. पण, आता शाळांना १२ मे रोजी सुटी लागण्याच्या आधी या बदली झालेल्या शिक्षकांना ७ मे रोजी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.जिल्ह्यांतर्गत बदलीप्रक्रिया आचारसंहितेमुळे तात्पुरती थांबवण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना. भंडारकर यांनी २२ मार्च रोजी जारी केले होते. त्यातून, कोकणातील शिक्षकांना मात्र वगळले होते.यास अनुसरून ‘राज्यातील शिक्षकांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित; ठाण्यासह कोकणातील शिक्षक बदल्या जैसे थे’ या मथळ्याखाली लोकमतने २४ मार्चला वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघड केला होता. या वृत्ताची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बदली झालेल्या शिक्षकांना आचारसंहिता संपेपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे आदेश ३० मार्च रोजी जारी केले होते. यामध्ये कोकणातील चार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांसह ठाणे जिल्ह्याच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांचादेखील समावेश होता.नवीन शाळेवर हजर होण्याची लगबगकोकण विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयात गुरुवारी बैठक झाली असता या शिक्षकांनी ७ मे पासूनच त्यांच्या नवीन शाळेवर हजर होण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.त्यानंतर, तातडीने तसे आदेशही पारित करण्यात आले. यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच नवीन शाळेवर हजर होऊन नंतर सुटीचा आस्वाद घेण्याची लगबग शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.
बदलीच्या ठिकाणी मंगळवारपासून हजर व्हा!, कोकण आयुक्तांचे शिक्षकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 1:03 AM