भिवंडी : उच्च न्यायालयांच्या आदेशावरून शहरातील अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना शिवीगाळी करून सरकारी कामात अडथळा करणारे माजी महापौर तथा कोनार्क विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक विलास आर पाटील यांच्यासह ८ ते १० कार्यकर्त्यां विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात काल गुरूवार रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.५च्या कार्यक्षेत्रातील चौथा निजामपूरा नदीनाका मेट्रो हॉटेल मागे मालमत्ता क्र.११४२ या जागेवर विनापरवानगी मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या अनाधिकृत इमारतीबाबत परिसरांतील नागरिकांनी पालिका कार्यालयांत लेखी तक्रारी केल्या होत्या. परंतू त्या तक्रारीकडे संबधित अधिकारी व कर्मचा-यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयांत दाखल झाले होते. उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत ही अनाधिकृत इमारत निष्कासीत करून त्याचा अहवाल कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश पालिकेले दिले होते. त्यानुसार पालिकेच्या प्रभाग समिती ५ चे अधिकारी साकीब खर्बे हे अतिक्रमण पथकासह तोडू कारवाई करण्यासाठी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी गेले. तेथे कारवाईला सुरूवात करताच नगरसेवक विलास आर पाटील हे टेम्पो युनियनच्या ८-१०जणांना घेऊन आले आणि अनाधिकृत बांधकाम तोडण्यासाठी प्रतिबंध करून अडथळा निर्माण केला. तसेच शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली,अशी तक्रार साकीब खर्बे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिली असता पोलीसांनी विलास आर.पाटील यांच्यासह टेम्पो युनियनच्या ८-१० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली असुन शहरातील अनाधिकृत बांधकामांना काही अधिका-यांप्रमाणे काही नगरसेवक देखील संरक्षण देत असल्याचे या निमीत्ताने उघड झाले आहे.