भिवंडी : भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील सर्व भांडी साहित्य जाळून खाक झाली. भिवंडीत आगी लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ९ ते १० खोल्यांना भीषण आग लागून येथील रहिवाशांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती.
तर शनिवारी कचेरी पाडा येथील बालसुधारगृहा लगत असलेल्या विद्युत ट्रांसफार्मरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना ताजी असताना रविवारी सकाळच्या सुमारास भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून गोदामातील सर्व भांडी साहित्य जाळून खाक झाली आहे. झेंडा नाका परिसरात एक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे संसार उपयोगी भांड्यांचे गोदाम आहे. तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रहिवाशी राहत असून अचानक भांड्याच्या गोदामातून धूर बाहेर येताना इमारतीमधील रहिवाशाना दिसला. त्याने इतर नागरिक व इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आगीची माहिती देताच, एकच गोंधळ उडाला होता.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गजबजलेल्या वस्तीत या दोन मजली इमारतीमध्ये असलेल्या भांड्याच्या गोदामाला आग लागताच पहिल्या मजल्यावरील आणि शेजारील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. हि आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यासंदर्भातील तपास सुरू आहे.