नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी तालुका जणू काही ज्वालामुखीचा तालुका ठरू पाहत आहे, या तालुक्यात आगीचे सत्र सुरु असून सोमवार व मंगळवारी आगीच्या चार घटना घडल्या असतांनाच बुधवारी दुपारच्या सुमाराला पुन्हा मेणबत्तीसह लोबान साठवून ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायतींच्या वळपाडा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोदामात घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यत लाखोंचा मेणबत्ती व लोबानचा साठा जळून खाक झाला होता.
विशेष म्हणजे लोबान (धूप) व मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने या साठ्याला लागलेल्या आगीने त्वरित पेट घेतला. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. यामुळे गोदामाच्या लगत असलेल्या इतर गोदामांनाही आगीची झळ पोहचण्या आधीच स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करीत कामगारांच्या मदतीने आगीवर पाणी मारीत आग आटोक्यात ठेवल्याने ती इतर गोदामा पर्यंत पोहचू न देण्याचा प्रयत्न केल्याने इतर गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्या पासून वाचविण्यात यश आल्याने कोट्यवधी रुपयाचे नुकसान टळले असून हि आग नेमकी कशा मुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान भिवंडी महापालिकेच्या अग्निशमदलाची अवघी एक गाडी आज आग लागल्यानंतर घटनास्थळावर आली होती, मी स्वतः गावातील आठ ते दहा पाण्याचे टँकर मागवून या आगीवर नियंत्रण मिळवले , जर स्थानिक टँकर मिळाले नसते तर आज मोठा अनर्थ झाला असता अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य विकास भोईर यांनी दिली आहे.