मीरारोड : देशातील पहिली ६८ मीटरपर्यंत पोहचणारी अग्निशमन दलाची गाडी खरेदी केल्याचा गाजावाजा करत लोकार्पण सोहळा साजरा करणाऱ्या मीरा- भाईंदर महापालिकेवर ही गाडी नागरिकांच्या सेवेत न आणताच ती नादुरुस्त असल्याने परत पाठवण्याची नामुष्की ओढवली आहे. तब्बल साडेसोळा कोटींचा खर्च झाला आ .
पाच फेब्रुवारी रोजी गाजावाजा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परदेशी बनावटीच्या या टर्न टेबल लॅडरचे लोकार्पण केले होते. त्यावेळी ६८ मीटर उंचीची शिडी असलेली ही गाडी अत्याधुनिक असून ती खरेदी करणारी मीरा- भाईंदर ही देशातील पहिली पालिका असल्याचे म्हटले होते. परंतु आजपर्यंत ही गाडी सेवेत दिसली नाही. कारण ही गाडी नुकसानग्रस्त आणि नादुरुस्त असतानाही उदघाटन केल्याचे सूत्रांनी सांगितले. जर्मन बनावटीच्या या गाडीची एकूण किंमत १२ कोटी ४३ लाख ६७ हजार ४६३ इतकी आहे . त्यात पैकी बँक कमिशनसह या गाडीसाठी ११ कोटी १९ लाख ७१ हजार ६७० रुपये पालिकेने कंत्राटदारास दिलेले आहेत, तर करापोटी पालिकेला तीन कोटी ९८ लाख ३९ हजार ६७० रुपये भरावे लागले. गंभीर बाब म्हणजे शिडीच्या टोकावर असणाऱ्या बकेटचा भाग तुटका असताना तो लपवून ठेवला. उद्घाटनानंतर जर्मन कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गाडीच्या काही भागांतील आवरण बाजूला केले गेले असता तुटका भाग निदर्शनास आल्याचा दावा पालिका वर्तुळातून केला जात आहे. त्यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी बकेटचा तेवढा भाग बदलून देण्याची तयारी दाखवली असली तरी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यास नकार दिला होता. शेवटी कंपनीच्या पथकाने ही गाडी २३ मार्च रोजी पालिकेकडून पुन्हा घेऊन गेले आहेत. तेथे ती दुरुस्त करून परत पाठविली जाणार असली तरी त्यासाठी किती कालावधी लागेल हे स्पष्ट झालेले नाही.