ठाणे : जलजन्य आणि कीटकजन्य साथीच्या आजारांमध्ये शहरी विभागात रुग्णांची संख्या अधिक असली तरी, या आजारांमुळे एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले. यामध्ये विषमज्वर आणि अतिसार या आजारांच्या रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला असून डेंग्यूचे रुग्ण पाचशेच्या पुढे गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरात (जलजन्य व कीटकजन्य) या साथीच्या आजारांच्या एकूण चार हजार ४२८ रु ग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयासह अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५१६ रु ग्ण हे विषमज्वराचे असून त्यापाठोपाठ अतिसाराचे एक हजार सात रु ग्ण होते. हगवणीचे ७५० रुग्ण असून, डेंग्यूसंशयित ५३५, गॅस्ट्रोचे २८१, मलेरियाचे १९७ तसेच कावीळचे १२६ आणि कॉलराचे १६ रु ग्ण आढळून आले होते. मेंदूज्वर, गोवर, चिकनगुणिया आणि लेप्टोचा एकाही रुग्ण जिल्ह्यात आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा सामान्य रु ग्णालय सूत्रांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे ४५८ रुग्णठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात डेंग्यू झालेले ४५८ रुग्ण दाखल झाले होते. यामधील ५१ रुग्ण हे डिसेंबर महिन्यातील आहेत. वर्षभरात अंबरनाथमध्ये ५२ आणि बदलापुरात २५ डेंग्यूचे रुग्ण नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते.मागील काही वर्षांच्या अनुभवातून जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मध्यंतरी जिल्ह्यात पुराचे पाणी शिरल्याने रोगराई पसरण्याची शक्यता उद्भवली होती. त्यामुळे साथीच्या आजारांची लक्षणे दिसली की, त्याला लगेच उपचारार्थ दाखल केले जात होते. योग्य उपचार मिळाल्याने सुदैवाने कोणीही दगावले नाही. -डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे