ठाणे : राज्यभराप्रमाणेच जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कोरोना उपचार घेतलेल्यांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. या गरजेस अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मागणीस अनुसरून नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरबाड तालुक्यासाठी पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रटर्स मशीनचा पुरवठा केला आहे. या मशीनचे वाटप पवार यांनी मंगळवारी केले.
मुरबाड तालुक्यातही ऑक्सिजनटंचाई जाणवत आहे. कोविड सेंटरमधून उपचार घेऊन आलेल्या रुग्णांनाही काही वेळा ऑक्सिजनची गरज भासते. त्यावेळी नातेवाइकांची धावपळ उडत होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी व शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांनी मुरबाड तालुक्याला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स देण्याची मागणी केली होती. त्यानुसार या मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून मशीन उपलब्ध केल्या. या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तातडीने मशीन मुरबाडपर्यंत पोहोचविल्या आहेत.
---------------------