ठाणे : जिल्हा प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे. कोरोनाच्या लढाईत सर्वांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. जे अधिकारी व कर्मचारी कोरोनाची लढाई लढताना शहीद झाले आहेत, त्यांच्या नातेवाइकांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांसाठी सिडकोमध्ये चार हजार ५०० घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आल्यामुळे ३० शिवभोजन केंद्रे चालू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे, असे नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी स्पष्ट केले.
स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन समारंभ रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पार पडला. यावेळी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कोराेनाची दुसरी लाट योग्य पद्धतीने हाताळल्याने, आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, महापौर नरेश मस्के, आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ठाणे मनपा आयुक्त विपिन शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, पोलीस आयुक्त जयजित सिंग, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदींसह सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोकणात मुसळधार पावसामुळे जी आपत्ती आली होती, त्याच्या मदतीसाठी ठाणे महानगरपालिका, आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) आदींनी आपत्तीजन्य परिस्थितीत शोध, बचावकार्य करून महत्त्वाचे योगदान दिले आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम केलेले अधिकारी व कर्मचारी, संस्था यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका, आपत्ती प्रतिसाद दल, आपत्तीजन्य परिस्थितीत शोध, बचावकार्य केल्याबद्दल जवान तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
---------- पूरक जोड आहे