जळीतकांडाने ‘त्यांच्या’ मनाचा उडतो थरकाप; हरेशच्या चुकीने उद्ध्वस्त झाल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:09 AM2020-02-05T01:09:24+5:302020-02-05T01:10:55+5:30

रिंकू पाटील हत्याकांडाच्या आठवणी ३० वर्षांनंतर ताज्या

The flickering of 'their' mind with the burning fire; The feeling of being harassed by Haresh's wrong | जळीतकांडाने ‘त्यांच्या’ मनाचा उडतो थरकाप; हरेशच्या चुकीने उद्ध्वस्त झाल्याची भावना

जळीतकांडाने ‘त्यांच्या’ मनाचा उडतो थरकाप; हरेशच्या चुकीने उद्ध्वस्त झाल्याची भावना

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : हिंगणघाट येथील शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याच्या घटनेनंतर रस्त्यावरील आक्रोश व संताप टी.व्ही.च्या पडद्यावर दिसू लागताच पटेल यांच्या घरातील मंडळी टी.व्ही. बंद करतात... घरात मन विषण्ण करणारी शांतता पसरते... ३० वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेच्या आठवणी जाग्या होतात. रिंकू पाटील या दहावीच्या वर्गातील मुलीला अशाच प्रकारे जाळून मारण्याच्या घटनेतील प्रमुख आरोपी हरेश पटेल याच्या त्या कृष्णकृत्यामुळे पटेल कुटुंबालाही रोषाचा सामना करावा लागला होता. कुटुंबातील एका माथेफिरु व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब कसे बरबाद होते, त्याचे हे उदाहरण असल्याचे पटेल कुटुंबीय मान्य करतात.

रिंकूची हत्या करुन फरार झालेल्या हरेशचा आठवडाभरात मुंब्रा खाडीपाशी मृतदेह सापडला होता. या धक्क्याने त्याच्या आईचे एका वर्षात निधन झाले तर वडिलांनी अंथरुण पकडले व त्यांचाही काही वर्षांत अंत झाला. हरेशला दोन भाऊ असून त्यांची लग्ने झाली आहेत. त्यांना मुले आहेत. ती उच्चशिक्षण घेत आहेत. मात्र जळीतकांडाचे भूत त्यांच्या कुटुंबाच्या मानेवरुन उतरलेले नाही. रिंकूच्या हत्येच्या धक्क्याने तिचेही वडील गेले.

हिंगणघाटच्या जळीतकांडाने जसे समाजमन हेलावले तसेच ते रिंकूपाटील हिच्या हत्याकांडानंतरही हेलावले होते. रिंकू पाटील हिचे नातलग उल्हासनगर सोडून बदलापूरला गेले. पण त्यांचा ठावठिकाणा कळला नाही. मात्र त्या प्रकरणातील आरोपी हरेशच्या नातलगांना शोधून काढले. ३० वर्षानंतरही जेव्हा अशा जाळून मारण्याच्या हत्याकांडाच्या बातम्या पाहतो, वाचतो तेव्हा आमच्या कुटुंबाच्या मनाचा थरकाप उडतो, अशी भावना हरेशच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

हरेशच्या त्या दुष्कृत्याने आमचे कुटुंब उदध्वस्त झाले. भावनेच्या भरात घरातील मुले अशी घोडचूक करतात. मात्र त्याची किंमत घरातील प्रत्येकाला भोगावी लागते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एकतर्फी प्रेमातून कॉलेज शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रकार विदर्भातील हिंगणघाट येथे घडला. शिक्षिका मृत्यूशी झुंज देत आहे.

उल्हासनगरातील रिंकू पाटील तब्बल ३० वर्षापूर्वी ३० मार्च १९९० रोजी एसएससी परीक्षेच्या भूमितीच्या पेपरला गेली होती. १६ वर्षीय रिंकू हिला परीक्षा केंद्रात अंगावर पेट्रोल टाकुन जिवंत जाळत आले होते. शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या हरेश पटेल याने एकतर्फी प्रेमातून रिंकूला संपविण्यासाठी हातात तलवारी, पेट्रोलनी भरलेले कॅन घेवून ३ साथीदारांच्या मदतीने झुलेलाल शाळेचे परीक्षा केंद्र गाठले. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराशी सुरक्षेला तैनात दोन पोलिसांना त्यांनी मारहाण करून पिटाळून लावले होते.

आरोपींना झाली होती जन्मठेपेची शिक्षा, आता आहेत बाहेर

शाळेतील ज्या खोलीत रिंकू होती तेथे प्रवेश करून इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हरेश व त्याच्या साथीदारांनी बाहेर काढले व दरवाजा आतून बंद केला. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या रिंकूच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. पेटलेल्या रिंकूने जीव वाचविण्यासाठी आंकात केला. मात्र कोणीही धावून आले नाही. रिंकूचा जागीचा मृत्यू झाला. आरोपी हरेशसह इतरांनी तेथून पळ काढला. या हत्याकांडाने देश हादला.

आठ दिवसांनी हरेश याचा मृतदेह मुंब्रा खाडी जवळील रेल्वे मार्गावर मिळाला. त्यांच्या इतर तीन साथीदारांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. शिक्षा भोगून आज ते बाहेर आले आहेत. रिंकूच्या हत्येनंतर तिचे कुटुंबीय घर सोडून गेले. आरोपी हरेश पटेलच्या कृत्याने वर्षभरात त्याच्या आईचा मृत्यू झाला. अंथरुण धरलेल्या वडिलांचाही पाठोपाठ मृत्यू झाला होता.

Web Title: The flickering of 'their' mind with the burning fire; The feeling of being harassed by Haresh's wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.