‘ती फुलराणी’त रसिकांना फुटला घाम
By admin | Published: April 15, 2016 01:27 AM2016-04-15T01:27:44+5:302016-04-15T01:27:44+5:30
गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका
कल्याण : गैरव्यवस्थापनामुळे आधीच पांढरा हत्ती ठरलेल्या आणि सक्षमपणे चालवता येत नसलेल्या कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका गुरुवारी नाट्यरसिकांना बसला. ‘ती फुलराणी’ नाटकावेळी रसिकांसोबत कलाकारही घामाघूम झाले.
मध्यंतरावेळी रसिकांचा पारा चढल्याने तासभर प्रयोग सुरू होऊ शकला नाही. संतप्त प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घातला. काही प्रेक्षकांनी पैसे परत मागितले, तर काहींनी प्रयोग तसाच सुरू ठेवण्याची मागणी केल्याने गोंधळ वाढला. अखेर, कसाबसा एसी सुरू करून पालिकेने आपली सुटका करून घेतली. पण, यामुळे पालिकेच्या ताब्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला.
अत्रे रंगमंदिरात सायंकाळी साडेचार वाजता ‘ती फुलराणी’चा प्रयोग होता. त्याला २७० प्रेक्षक हजर होते. पहिला अंक सुरू असतानाच प्रेक्षकांना, कलाकारांना उकाड्याचा त्रास होऊ लागला. मध्यंतर
होताच प्रेक्षकांनी त्याचा जाब विचारला आणि जोवर एसी सुरू होत नाही, तोवर प्रयोग सुरू न
करण्याचा मुद्दा लावून धरला. सुविधा देता येत नसतील, तर तिकिटाचे पैसे परत करा.
खेळ थांबवा. आमचा रसभंग झाला आहे, असे मुद्दे तावातावाने मांडले. नाटकाचे निर्माते धनंजय चाळके यांनी ज्या प्रेक्षकांना पैसे परत हवे असतील, त्यांना पैसे परत केले जातील, असे स्टेजवरून जाहीर केले. काही प्रेक्षकांनी प्रयोग बंद करण्याची मागणी केली, तर काहींनी एसी सुरू करून पुढचा अंक सादर करण्याची भूमिका घेतल्याने प्रेक्षकांतच दोन तट पडले. ते हमरीतुमरीवर आल्याने कलाकारही अस्वस्थ झाले.
(प्रतिनिधी)
व्यवस्थापकांचा दोष
अखेर, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक स्टेजवर आले. एसी नादुरुस्त असल्याचा फटका कलाकारांनाही बसल्याचे त्यांनी सांगितले आणि यात नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांचा दोष असल्याचे मत मांडले.
मात्र, संतापलेल्या काही प्रेक्षकांनी ओक यांनाही बोलू दिले नाही. तोवर, कसाबसा एसी सुरू करून नाटकाचा पुढचा अंक सुरू झाला. तोवर, काही प्रेक्षक बाहेर पडले.
त्यांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. आमचा विरोध नाटकाला नाही, तर गैरव्यवस्थापनाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी बाजारपेठ ठाण्यातील पोलीस आले.
या नाटकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सचिव सुभाष भुजबळ उपस्थित होते. पण, त्यांनी वादात मध्यस्थी केली नाही. प्रेक्षकांचा गोंधळ सुरू असताना नाट्यगृहाचे व्यवस्थापक समोर आले नाहीत की, त्यांनी बाजू मांडली नाही.