ठाणे - कोरोनाच्या गेल्या अडीच वर्षांपासून प्रथमच ठाणे जिल्ह्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्या शुन्य नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना या जागतिक महामारीच्या काळानंतर मंगळवार हा कोरोना मुक्त दिवस निश्चित झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा ऐतिहासिक ठरल्याचे ठाणे सिव्हिलचे डाँ. प्रसाद भंडारी यांनी नमूद केले आहे.
कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शुन्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगर पालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात आज एकही रुग्ण नोंद झाला नाही. कोरोनाच्या महामारीनंतर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आजचा हा दिवस कोरोना मुक्तीचा व आनंदाचा म्हणून नोंद झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यातून आज एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोरोनानंतर हे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पडलेले पाऊल असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
या कोरोना मुक्त दिनाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारी संध्याकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात सात लाख ४७ हजार ३५६ रुग्णांची नोंद गेल्या अडीच वर्षांच्या या कोरोना कालावधी झाली आहे. सध्या ५६ रुग्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत सात लाख ३६ हजार १०२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृत्यू आजही शुन्य नोंद असताना या कोरोना कालावधी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ९६७ मृतांची नोंद घेण्यात आली आहे.