ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी जवळपास १ लाख अँटीजन चाचणीचे किट्स उपलब्ध असताना दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मात्र खासगी लॅबमध्ये चाचणी करण्याची सक्ती करण्यात येत असून तसे न केल्यास दुकाने सील करण्यात येतील, अशी धमकी पालिका अधिकारी देत असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाण्यातील दुकानदारांनी केला आहे. एक तर लॉकडाऊनच्या काळात चार महिने दुकाने बंद असताना दुसरीकडे चाचणीसाठी २८०० रुपये देणे परवडत नसल्याने व्यापारी वर्गाने पालिकेच्या या फतव्याला विरोध दर्शवला आहे.विशेष म्हणजे दुकानदारांनी खासगी लॅबमध्ये चाचणी करावी यासाठी पालिकेकडून चिट्ठी देण्यात येत असून यात खासगी लॅबचे नाव आणि संपर्क क्रमांक देखील देण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून १९ जुलैनंतर हॉटस्पॉट वगळून इतर सर्व ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्याने गेल्या चार महिन्यांपासून दुकाने बंद असलेल्या दुकानदारांना आणि व्यापारी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र एका बाजूने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी दुसऱ्या बाजूला मात्र या सर्च दुकानदारांना खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी करण्याची सक्ती केली जात असल्याचा खळबळजनक आरोप दुकानदारांनी केला आहे. यासाठी दुकानांमध्ये जाऊन पालिका कारभारी एक चिठ्ठी दुकानदारांना देत असून यामध्ये खाजगी लॅबचे नाव आणि संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. जर अशाप्रकारची चाचणी केली नाही तर दुकाने सील करण्याची धमक्या देत असल्याचा आरोप देखील दुकानदारांच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणात ठाणे महापालिकेचे नगरसेवक नारायण पवार यांनी देखील ही गंभीर गोष्ट पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील काही व्यापाऱ्यांनी मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगिल्यानंतर त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे. पालिकेकडे अँटीजन टेस्टचे किट्स असताना दुकानदारांना अशा प्रकारे खाजगी लॅबमध्ये चाचणीसाठी सक्ती का करण्यात येते ? असे प्रकार खपवून घेतले जाणार असून संबंधित अधिकाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महेश कदम यांनी दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी मला माझ्या दुकानात चिट्ठी आणून दिली होती. आणि चिट्ठीमध्ये दिलेल्या ठिकाणी चाचणी न केल्यास दुकाने सील करण्यात येतील अशी तंबी दिली जात आहे. दुकानदारांची चाचणी मोफत का केली जात नाही. - नजीर शेख, दुकानदार
एक मॅडम एक चिट्ठी घेऊन आल्या होत्या. त्या कुठून आल्या त्यांनी सांगितले सुद्धा नाही. यापूर्वी वाडिया हॉस्पिटलला जाऊन चाचणी देखील केली होती. मात्र या ठिकाणी चाचणी केली नाही तर दुकाने बंद ठेवा असे आम्हाला सांगण्यात आले आहे. -सिल्व्ही डिसोजा , दुकानदार