हुक्का पार्लरवरील धाडीत चौघांना अटक, मुंब्य्रात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:49 AM2018-01-31T06:49:27+5:302018-01-31T06:49:37+5:30
दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरू झालेल्या एका हुक्का पार्लरसह दोन ठिकाणी कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली.
ठाणे : दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरू झालेल्या एका हुक्का पार्लरसह दोन ठिकाणी कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली. नशेसाठी त्यांनी वापरलेली सामुग्रीही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.
मुंब्रा परिसरात नव्यानेच दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू झाल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांना मिळाली होती. तिच्या आधारे एसीपी धुमाळ यांच्यासह मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, पोलीस हवालदार सय्यद फिरोज, धनंजय घोडके, पोलीस नाईक तेजस परब आणि समाधान भोसले आदींच्या पथकाने सोमवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवरील ‘किंग ढाबा’ याठिकाणी छापा टाकून हुक्का पार्लरचा चालक महंमद अफरोज शेख याच्यासह इरफान शेख आणि राजपूत वर्मा या दोन ग्राहकांना तसेच अन्य एका नव्यानेच सुरू झालेल्या हुक्का पार्लरमधून चालक इरफान मिर्झा अशा चौघांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. वळतकर यांनी सांगितले.
मुंबईप्रमाणेच कारवाई
मुंबईत गेल्याच महिन्यात हुक्का पार्लरमधील आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि परिसरातील अशा बेकायदेशीरपणे चालणाºया हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.