ठाणे महापालिकेचे चार अभियंते निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:44 AM2021-09-26T04:44:22+5:302021-09-26T04:44:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील खड्ड्यांवरून राज्याचे नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधक व मीडियाने लक्ष्य केल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील खड्ड्यांवरून राज्याचे नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधक व मीडियाने लक्ष्य केल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी शिंदे यांच्या आदेशावरून पालिकेच्या चार अभियंत्यांना निलंबित केले. चेतन पटेल, प्रकाश खडतरे, संदीप सावंत आणि संदीप गायकवाड अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून खड्डे भरणे तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली गेली.
शिंदे यांनी शुक्रवारी स्वतः रस्त्यावर उतरून ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते. आनंदनगरपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करताना पालकमंत्र्यांनी सुरुवातीलाच ठाणे पालिका आणि इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, पैसे देऊनही कामे होत नाही त्यामुळे सरकारचे नाव खराब होते. कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना भरला. कामांमध्ये आणि गुणवत्तेमध्ये दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी आयुक्त डॉ.शर्मा यांना दिले.
डॉ. शर्मा यांनी लागलीच शनिवारी चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली. प्रकाश खडतरे हे वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत असून चेतन पटेल हे उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. संदीप सावंत आणि संदीप गायकवाड हे लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत आहेत. संदीप सावंत यांच्या अखत्यारीत पालकमंत्र्यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोड येतो.
........
ठेकेदारांनाही नोटिसा काढण्यास सुरुवात
शिंदे यांनी कामात गुणवत्ता नसलेल्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता ठेकेदारांनाही नोटिसा काढण्यास सुरुवात केली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
...........
इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?
ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले उड्डाणपूल हे एमएसआरडीसीच्या अंतर्गत येत असून या उड्डाणपुलावरदेखील खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात इतर प्राधिकरणाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न महापालिकेतील अभियंते विचारत आहेत.
............