चार महिने उलटूनही रस्ता ‘जैसे थे’; मनविसेचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:27 AM2019-12-12T01:27:08+5:302019-12-12T01:27:26+5:30
रस्तादुरुस्ती कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह
डोंबिवली : केडीएमसीसह अन्य प्राधिकरणांकडून एखाद्या कामासाठी रस्ता खोदला असता त्याची तत्परतेने डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या कामाच्या ठिकाणी पडलेले खड्डे आणि धुळीचा नागरिकांना होणारा त्रास पाहता मनसेने केडीएमसीला जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्तादुरुस्ती कामांच्या दर्जावरही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अन्य प्राधिकरणांकडून सुरू असलेली केबल टाकण्याची कामे असो अथवा केडीएमसीतर्फे अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजनेची कामे असोत, बहुतांश ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. काही कामांमुळे रस्ते आता वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. आधीच पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांनी नागरिकांना बेजार केले असताना त्यात आता खोदकामांची भर पडली आहे. सातत्याने सुरू असलेल्या या खोदकामांमुळे रस्ता दुरवस्थेच्या गर्तेत सापडले असून त्याठिकाणाहून वाहन चालवणे धोकादायक झाले आहे.
डोंबिवलीतील बहुतांश रस्त्यांची ही स्थिती असताना येथील पूर्वेकडील सुनीलनगरमधील रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. याठिकाणी केडीएमसीच्या वतीने भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण होऊन चार महिने उलटले तरी अद्याप खड्डेमय परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली आहे. प्रारंभी पावसाचे कारण देण्यात आले. आता पाऊस जाऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी तिथे केडीएमसीचा कोणताही अधिकारी फिरकलेला नाही. यासंदर्भात मनविसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी केडीएमसीच्या बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.
आंदोलनाचा इशारा
कधीतरी आपले वातानुकूलित दालन सोडून प्रभागात फेरफटका मारावा. तेथील नागरिकांना खराब रस्त्यामुळे व उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर प्रभागातील रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली नाहीत तर मनविसे जनआंदोलन छेडील, असा इशारा जेधे यांनी दिला.