लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरड कोसळण्याचा हा सिलसिला ठाण्यात मागील काही वर्षे सतत सुरूच आहे. मागील चार वर्षांत अशा १९ घटना घडल्या आहेत. यामध्ये सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर दबलेल्या तिघांना वाचविण्यात ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला यश आले आहे. मात्र, यात दोषी असलेल्या यंत्रणा मोकाटच आहेत.
दरवर्षी अशा घटना घडत असतानादेखील केवळ नोटीस बजावणे, सर्व्हे करणे यापलीकडे काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. येथील रहिवाशांचे काय करायचे याचे उत्तरदेखील प्रशासनाला अद्यापही सापडलेले नाही. आजही सुमारे ६० हजारांच्या आसपास नागरिक अशा दरडींच्या छायेखाली जगत आहेत.
ठाणे शहराला डोंगर रांगांनी आणि खाडीकिना : याने वेढलेले आहे. त्यातच ठाणे हे मुंबईच्या लगतचे शहर आहे. त्यामुळे या शहरात नागरिकांचा ओढा अधिकच आहे. दिवसेंदिवस वाढत्या नागरिकांमुळे जमिनीबरोबर फ्लॅटचे ही भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफियांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे डोंगर असो या खाडीकिनारा तेथे बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. स्वस्तात राहण्याची व्यवस्था होते म्हणून तेथे अशीमंडळी कुटुंबासह स्वत: मृत्यूच्या दारावर जीवन जगत आहेत. अशातच अशा नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा नाहक बळी जात आहे. ठाण्यातील कळवा, मुंब्रा, वागळे, उपवन आदी डोंगरांवर बेकायदेशीर झोपड्यांना ऊत आला आहे. पावसाळ्यात नेहमीच डोंगरावर वसलेल्या नागरिकांना दरडी कोसळण्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देऊन नोटिसा बजावण्यात येत आहेत.
२०१७ पासून आतापर्यंत १९ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ११ दरड कोसळण्याच्या घटना या एका मुंब्य्रात घडल्या आहेत. यात कोणताही जीवितहानी झाली हेच काय ते सुदैव म्हणावे लागणार आहे. यापाठोपाठ कळव्यात सहा घटना घडल्या असून, त्यापैकी दोन घटनेत मात्र निष्पाप दोन कुटुंबातील सात जणांचा नाहक बळी गेला आहे. तर तिघे जण बचावले आहेत. यामध्ये कळव्यातील आदर्श मित्रमंडळ चाळीवर डोंगरांचा भाग कोसळला होता. ती घटनाही २०१७ मध्ये जुलै महिन्यातीलच असून, त्यावेळी एक कुटुंब, एकत्र घरात होते. ते तिघे त्या ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातील वीरेंद्र आणि त्याचा १० वर्षीय सनी या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी बचावली होती. तसाच प्रकार १९ जुलै २०२१ रोजी घडला. घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत यादव कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर वर्तकनगर आणि माजीवडा- मानपाड्यातही दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात कोणीही जखमी झाले नव्हते, अशी माहिती महापालिका सूत्नांनी दिली.
शासकीय यंत्रणांना जाग केव्हा येणार
गेली काही वर्षे सतत अशा प्रकारच्या घटना ठाण्याच्या विविध भागांत घडत आहेत. तरीसुद्धा अद्यापही शासकीय यंत्रणांना जाग मात्र येताना दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून भूस्खलनाच्या ठिकाणांची यादी तयार केली जाते, त्यानंतर तेथील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातात, तर दुसरीकडे त्यातूनही दरड कोसळण्याची घटना घडली तर ती जागा कोणाच्या हद्दीत आहे, त्यानुसार जबाबादरी संबंधित यंत्रणेवर ढकलून आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातही वनविभागाकडून अशा घटना घडल्यानंतर केवळ सर्व्हेची थातूरमातूर कारवाई केली जाते. परंतु, पुढे काहीच होत नाही, या जागेत दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, त्यामुळे ती बांधणाऱ्या भूमाफियांवर कारवाई केव्हा होणार, त्याठिकाणच्या संबंधित सहायक आयुक्तांना जबाबदार केव्हा धरणार? असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहत आहेत.
ठाण्यातील दरडी कोसळण्याचा तक्ता
वर्ष घटना
२०१७ ०४
२०१८ ०१
२०१९ ०६
२०२० ०२
२०२१ ०६