ठाणे: मोटारकारच्या बदल्यात दहा लाख रुपये देण्याची बतावणी करीत नवी मुंबईच्या काशिनाथ बहिराम (६५) या जेष्ठ व्यावसायिकाची संजय जाधव आणि सिमोन मिरांडा या दोघांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली.
यासंदर्भात बहिराम यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांना जुलै २०२२ मध्ये त्यांना व्यावसायासाठी दहा लाखांच्या रकमेची गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीचे संजय जाधव यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. तेंव्हा त्यांनी ठाण्याच्या माजीवडा येथील सिमसेन मिरांडा यांच्याकडे ३० जुलै २०२२ रोजी येण्यास सांगितले. त्याठिकाणी बहिराम हे गेल्यानंतर त्यांना पैसे पाहिजे असल्यास प्रतिज्ञापत्रावर लेखी द्यावे लागेल. शिवाय, त्याबदल्यात तुमची ज्याग्वार ही कारही गहाण ठेवावी लागेल, असे सांगितले.
पैशांची गरज असल्यामुळे जाधव आणि मिरांडा यांनी आणलेल्या कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षºयाही केल्या. नंतर दहा लाखांची रक्कम मिळण्याची ते प्रतिक्षा करीत होते. परंतू, रक्कम आॅनलाईन ट्रान्सफर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तेंव्हा जाग्वार कार आणि तिची चावी मिरांडा यांच्या ताब्यात देऊन ते निघून आले. नंतर काही वेळा नेटवर्कची समस्या तसेच काही वेळा अन्य कारणे देत त्यांनी पैसे देण्याचे टाळले. त्यानंतर वारंवार मिरांडा यांना त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव आणि मिरांडा यांनी पैसे किंवा त्यांची मोटारकारही परत केली नाही. अखेर याप्रकरणी बहिराम यांनी १८ आॅगस्ट २०२३ रोजी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जाधव आणि मिरांडा या दोघांविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.