डायलेसीस सेंटरच्या माध्यमातून गरीब रुग्णांना मिळणार मोफत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:36 PM2017-11-09T17:36:44+5:302017-11-09T17:45:04+5:30
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना आता ठाणे महापालिकेने शहरातील तीन ठिकाणी पहिल्या टप्यात डायलेसीस केंद्राची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाखापर्यंत कमी असेल त्यांना ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे.
ठाणे - कोपरी येथील प्रसुतीगृहात सुरु करण्यात आलेल्या नव्या डायलेसीस सेंटरचा शुभारंभ बुधवारी सांयकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आता सोमवार पासून हे सेंटर ठाणेकरांच्या सेवेत रुजु होणार आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या डायलेसिस सेंटरमध्ये १ लाखांपर्यंत कमी उत्पन्न असलेल्या रु ग्णांना ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या तीन केंद्राचे उदघाटन करण्यात आली असून ज्या रुग्णांना डायलेसिसची आवश्यकता आहे त्यांनी या केंद्रामध्ये जाऊन उपचार घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .
ठाणे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या डायलेसीसच्या रुग्णांना अल्प दरात डायलेसीसच्या सुविधा उपलब्ध करु न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात सुरु असलेल्या डायलेसीस सेंटरचा मुद्दा काही वर्षांपूर्वी चांगलाच वादादीत ठरला होता. गोर गरीब रुग्णांकडून हवे तर आकरले जात होते. त्यामुळे हे डायलेसीस सेंटर बंद करुन गोरगरीब रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात अशा प्रकारची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती सभापती तथा विद्यमान सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपूर्वी शहरात पाच ठिकाणी डायलेसिसची केंद्र उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. आता दोन वर्षानंतर अखेर ही डायलेसिस केंद्र सुरु करण्यात आली आहे . यासाठी प्रत्येक केंद्रांवर १० डायलेसिस मशीन अशा पाच केंद्रांवर ५० मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रांवर १० बेड असे पाच केंद्रांवर ५० बेड्स उपलब्ध करु न देण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे असून सुरु वातीला तीन केंद्र कार्यान्वयीत करण्यात आली असून उर्वरित दोन सेंटर येत्या दीड ते महिन्यात सुरु होतील अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ . आर टी केंद्रे यांनी दिली आहे .
या डायलिसीस केंद्रांच्या माध्यमातून ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे त्या रूग्णांवर मोफत डायलिसीस उपचार करण्यात येणार आहेत. तर ज्यांचा वार्षिक उत्पन्न गट १ लाख ते ८ लाख आहे, त्या रूग्णांसाठी ५२० रूपये फी आकारण्यात येणार आहेत. तसेच ज्यांचा वार्षिक उत्पन्न गट ८ लाखाच्यावर आहे त्या रूग्णांसाठी १०४० रूपये फी आकारण्यात येणार आहे. या प्रत्येक केंद्रामध्ये १० बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर दिवसभरात ४० रूग्णांना डायलेसिसचे उपचार देता येवू शकणार आहेत. शहरात पहिल्या टप्प्यात कोपरी प्रसुती गृह, कोपरी (पुर्व), कोरस रु ग्णालय, वर्तकनगर, ठाणे(प.) आणि रोझा गार्डिनिया हॉस्पीटल, कासारवडवली अशा तीन ठिकाणी ही डायलिसीस केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर उर्वरीत सी आर वाडिया रु ग्णालय, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आरोग्य केंद्र येत्या दोन महिन्यात सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले.