खंबाळपाड्यातील फुलमार्केट कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:21 AM2019-09-05T01:21:29+5:302019-09-05T01:21:44+5:30
विक्रेते फिरकलेच नाहीत : ग्राहकांना घ्यावी लागली कल्याणला धाव
डोंबिवली : पत्रीपुलावरील वाहतूककोंडी पाहता डोंबिवलीतील नागरिकांची सोय म्हणून गणेशोत्सवात येथील खंबाळपाडा परिसरात फुलमार्केट सुरू करण्याचे नियोजन केडीएमसीने केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यासाठी तात्पुरती जागाही देण्यात आली. पण चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे तेथे चिखल झाल्याने फूलमार्केट सुरू होऊ शकले नाही. परिणामी, नागरिकांना फुले व इतर पूजा साहित्य खरेदीसाठी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केट गाठावे लागले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न समितीमधील फुलमार्केटमध्ये फुले, पूजेचे साहित्य तसेच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. मात्र, सध्या पत्रीपुलावरील वाहतूककोंडीचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. डोंबिवली व २७ गावांमधील ग्राहकांना फुलमार्केटला येताना या कोंडीचा सामना करावा लागू नये, म्हणून डोंबिवलीतच तात्पुरते फुलमार्केट सुरू करावे, असे पत्र सर्वपक्षीय युवा मोर्चाने केडीएमसीला दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी खंबाळपाडा येथील रिक्त भूखंड पूजेचे साहित्य, फुले, हार, भाजीपाला व सणासुदीच्या सामानाच्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु, तेथे मार्केट सुरू झाले नाही.
भूखंडावर चिखल निर्माण झाला आहे. तसेच ही जागा योग्य नसल्याने फुलविक्रे ते तेथे फिरकलेच नाहीत. त्या भूखंडावर शेड उभारण्यात आली. मात्र, फुलविक्रेतेच नव्हते. सोमवारी गणेशचतुर्थी असल्याने नागरिक रविवारी पूजा साहित्य तसेच फुले खरेदीसाठी खंबाळपाडा येथे आले असता त्यांची घोर निराशा झाली. यावर टेबल मांडून फुलविक्रेत्यांची व्यवस्था केली जाईल, रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही होईल, त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, असा दावा फुलमार्केटसाठी पाठपुरावा करणारे सभापती दीपेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला होता.
‘पावसामुळे प्रचंड गैरसोय’
यासंदर्भात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहायक सचिव यशवंत पाटील म्हणाले की, पाऊस पडल्याने खंबाळपाड्यातील जागेवर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. तेथे बसण्यायोग्य जागाही नाही. त्यामुळे फुलमार्केटचे नियोजन करता आले नाही.