जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:23 PM2020-07-29T20:23:13+5:302020-07-29T20:23:19+5:30

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने ...

Funeral of 1022 corona victims at Jawaharbagh Cemetery? | जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

जवाहरबाग स्मशानभूमीत १०२२ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार?, महापालिकेने जाहीर केले ५८९ मृत्यू

Next

ठाणे : महापालिका क्षेत्रात कोरोनाने ५८९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना, केवळ जवाहरबाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्या १०२२ नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून जनतेपुढे खरी संख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.
ठाणे शहराला कोरोनाने विळखा घातला असून, ठाणे शहरात कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सुरुवातीपासून कोरोना मृतांवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. कालांतराने शहरातील अन्य स्मशानभूमीत ही व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी कोरोना मृतांचे दहन करण्यासाठी पाच ते सहा तासांची प्रतिक्षा करावी लागत होती, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.
जवाहरबाग स्मशानभूमीतील नोंदीवरून घेतलेल्या माहितीत २० मार्चपासून २८ जुलैपर्यंत १०२२ रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. महापालिकेने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकात ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील १२ हजार ५१५ नागरिक उपचार घेऊन घरी परतले. तर ५ हजार ४५ रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, जवाहरबागमध्ये कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयातून १०२२ मृतदेह आल्याची नोंद आहे. त्याव्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांची संख्या वेगळी असल्याचे समजते, असे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
-------------------------------------------------
राज्य सरकार, महापालिकेत कोरोना रुग्ण आकड्यांमध्ये तफावत 
राज्य सरकार व महापालिकेकडून कोरोना मृतांची संख्या व एकूण रुग्णांच्या संख्येत तफावत कायम आहे. याबाबत गेल्या चार महिन्यांत महापालिका प्रशासनाकडून खुलासा केलेला नाही. सध्याही राज्य सरकारकडून मृतांची संख्या ६८१ जाहीर करण्यात आली. तर महापालिकेकडून ५८९ जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. एकूण रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची तफावत आहे, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Funeral of 1022 corona victims at Jawaharbagh Cemetery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.