ठाणे : एका लिंकवर ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून नऊ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून सचिन गायकवाड (४१, रा. कोपरी, ठाणे) यांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अनोळखी भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा रविवारी दाखल झाला आहे.
कोपरीतील कांचनगंगा सोसायटीतील रहिवासी गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइलवर एका भामट्याने संपर्क साधून त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग केल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यातूनच त्याने त्यांचा विश्वास संपादन करून ३१ मे ते १८ जून २०२१ या कालावधीत त्यांना नऊ लाखांची गुंतवणूक करायला भाग पाडले. त्याने संगणकीय तंत्राचा वापर करून त्यांची ही नऊ लाखांची रक्कम त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइनद्वारे काढून फसवणूक केली. त्यानंतर वारंवार संपर्क करूनही त्याने त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्यांचे पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी या प्रकरणी अखेर कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.