गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:31+5:302021-09-15T04:46:31+5:30
ठाणे : गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या... असा जयघोष करीत मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात ...
ठाणे : गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या... असा जयघोष करीत मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी कोरोनारूपी विघ्नातून हे विघ्नहर्ता तूच आमची सुटका कर, असे साकडे भक्तांनी बाप्पांना घातले. या वर्षी ठाणे आणि आजूबाजूच्या शहरी भागात ४९ हजार ७८२ श्रींसह १५ हजार ७१७ गौराई मातेला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यातच पावसाची रिमझिम सुरू आहे. अगदी साध्या पद्धतीने यंदा विसर्जनासाठी बाप्पा निघाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, पोलीस प्रशासनाने चौकाचौकात, तसेच विसर्जन घाटावर चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डीजी ठाणे प्रणालीमार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन टाइम स्लॉट बुकिंग सुविधेसह कृत्रिम तलाव आणि मूर्ती स्वीकृती केंद्रांबरोबर विसर्जन घाटांचीही व्यवस्था केली आहे. ज्या भक्तांनी मास्क घातलेले नसतील अशांची अँटिजन चाचणी पालिकेच्या माध्यमातून सुरू असल्याचे दिसत होते.
ठाणे शहरातील ठाणे शहर परिमंडळात २६ सार्वजनिक आणि ८ हजार ४० घरगुती, तसेच वागळे इस्टेट परिमंडळात १५ सार्वजनिक व ८ हजार ५६ घरगुती बाप्पांना निरोप देण्यात आला. दोन्ही परिमंडळांत ३ हजार ७३७ गौरी मातेचे विसर्जन करण्यात आले. भिवंडीत २६ हजार आणि ४ हजार ५८९ घरगुती बाप्पांसह ५६० गौराईंचे विधिवत विसर्जन पार पडले. कल्याण परिमंडळात सार्वजनिक ३८, घरगुती १२ हजार ९५ आणि ३ हजार ३६४ गौरी मातेला भक्तिभावाने निरोप दिला. उल्हासनगर परिमंडळात २१ सार्वजनिक, १६ हजार ९०० घरगुती तर ८ हजार ५६ गौराईंचे विसर्जन करण्यात आले. एकूण १२६ सार्वजनिक, ४९ हजार ६५६ घरगुती आणि १५ हजार ७१७ गौरीमातेला भक्तगणांनी निरोप दिला.