गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, कल्याण-डोंबिवलीत विविध घाटांवर निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:12 AM2020-09-03T01:12:02+5:302020-09-03T01:12:35+5:30
केडीएमसीने विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सोय केली होती. तसेच राबवलेल्या ‘विसर्जन आपल्या दारी’लाही चांगला प्रतिसाद मिळाला.
कल्याण : कोरोनाचे सावट असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत गणेश विसर्जन अत्यंत साधेपणाने पार पडले. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ८७५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना भक्त भावुक झाले होते.
केडीएमसीने विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सोय केली होती. तसेच राबवलेल्या ‘विसर्जन आपल्या दारी’लाही चांगला प्रतिसाद मिळाला. कल्याणमधील दुर्गाडी खाडी, गणेशघाट, डोंबिवली रेतीबंदर खाडीकिनारा येथे मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुर्गाडी खाडीकिनारा येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, अभियंता सुभाष पाटील, आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी चार तराफे ठेवले होते. त्यावर मूर्ती घेऊन जाऊन कोळी बांधव खोल पाण्यात विसर्जन करत होते. तसेच मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी दोन मोठ्या बोटींची व्यवस्था केली होती. यापैकी एका बोटीवरून आयुक्तांनी खाडीत दूरपर्यंत फेरफटका मारून विसर्जनस्थळाची पाहणी केली. विसर्जन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने केले जात असल्याचे सांगितले. यावेळी काही पोलीस अधिकारी व कोळी बांधवांचा आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. बंदोबस्तासाठी तैनात केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी ‘विठू माऊली तू’ हे गीत गाऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अन्य पोलिसांनीही गीते गाऊन विसर्जनस्थळी एक भक्तिमय वातावरण निर्माण केले.
भिवंडीत शांततेत दिला निरोप
भिवंडी : भिवंडी शहर परिसरात मंगळवारी १० दिवसांच्या गणपतीचे शांततेत विसर्जन झाले. सार्वजनिक व घरगुती अशा एक हजार ७६३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ज्यामध्ये घरगुती एक हजार ६०१, सार्वजनिक १६२ मूर्तींचे विसर्जन झाले. ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. फुलांनी सजवलेल्या खाजगी वाहन व टेम्पोतून मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी आणण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा भादवड, वºहाळादेवी, कामतघर, नारपोली, तलाव व काल्हेर, कोनगाव, शेलार, टिळकघाट येथे सुरू होता. आमदार रईस शेख, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई, शांतता समिती सदस्य वसीम खान, पालिकेचे प्रभाग समिती अधिकारी दिलीप खाने, अधीक्षक मकसुद शेख, अन्य सदस्य उपस्थित होते.
उल्हासनगरमध्ये साडेआठ हजार मूर्तींचे विसर्जन
उल्हासनगर : दहा दिवसांच्या गणपतींचे मंगळवारी साधेपणाने विसर्जन झाले. महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांत संकलित केलेल्या साडेआठ हजारांपेक्षा अधिक बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन शांततेत पार पडल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
उल्हासनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपात व नागरिकांना घरीच मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रभाग समिती कार्यालयांनुसार एकूण १२ मूर्ती संकलन केंद्रांची स्थापना केली होती. या संकलन केंद्रांत जमा झालेल्या मूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन केले. मनसेनेही काही विसर्जनाची सोय केली होती.
यंदा गणेशमूर्तींच्या संख्येत मोठी घट
मीरा रोड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या आवाहनाला मीरा-भार्इंदरमधील भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी २० हजार ५६९ गणेशमूर्तींची स्थापना व विसर्जन करण्यात आले. यंदा मात्र नऊ हजार १७७ मूर्तींचे विसर्जन केले गेले. बहुतांश भाविकांनी घरात, सोसायटीच्या आवारातच बाप्पाचे विसर्जन केले.
महापालिकेने शहरातील विसर्जनस्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंदे्र उभारली होती. येथून लहान वाहनांतून मूर्ती खाडी वा तलावात नेऊन विसर्जित केल्या. अनेक मंडळे, शिवसेनेच्या वतीने स्वत:च पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव निर्माण केले होते. त्यामुळे अनेकांनी या तलावांना पसंती दिली.
गेल्या वर्षी मीरा-भार्इंदरमध्ये १९ हजार ९०३ घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदा तीच संख्या आठ हजार ७१० इतकी झाली. सार्वजनिक गणपतीही एक हजार १३ होते. पण, या वर्षी मात्र तीच संख्या केवळ ३०२ इतकी होती. बहुतांश मंडळांनी छोटेसे मंडप उभारले, तर काहींनी कार्यालयातच मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. अनेक सार्वजनिक मंडळांनी दीड दिवसांचा गणपती ठेवला होता.
अग्निशमन केंद्रातील बाप्पाचे बाराव्या दिवशी विसर्जन
मुंब्रा: येथील अग्निशमन केंद्रातील बाप्पाचे बाराव्या दिवशी बुधवारी संध्याकाळी मुंब्रेश्वर महादेव मंदिरासमोरील तलावामध्ये टाळमृदंगाच्या गजरात भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण आठ मुख्य अग्निशमन केंद्रे आहेत. यातील फक्त मुंब्रा अग्निशमन केंद्रात प्रत्येक वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.
इतर अग्निशमन केंद्रांप्रमाणेच या केंद्रातील जवानही अनंत चतुर्दशीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यात व्यस्त असतात. यामुळे त्या दिवशी ते दलाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणे शक्य नसल्याने केंद्रातील बाप्पाला एक दिवस उशिराने निरोप देण्यात येतो, अशी माहिती मुख्य स्थानक तसेच उपस्थानक अधिकारी अनुक्रमे तांबेश्वर मिश्रा आणि गणेश खेताडे यांनी लोकमतला दिली.