दिव्यातील ग्रामस्थांनी अडवल्या कचरा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:20+5:302021-09-25T04:44:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : ठाणे महापालिकेकडून कोणताही मोबदला न देता आठ वर्षांपासून दिव्यातील खासगी जागेत बेकायदा कचरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : ठाणे महापालिकेकडून कोणताही मोबदला न देता आठ वर्षांपासून दिव्यातील खासगी जागेत बेकायदा कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे तेथे कचरा टाकून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत दिव्यातील काही स्थानिक रहिवासी व जागा मालकांनी कचरा टाकण्यासाठी चाललेल्या गाड्या शुक्रवारी रस्त्यावर अडवल्या. या गाड्या पुढे जाऊ नयेत, यासाठी एक ग्रामस्थ चक्क गाडीच्या खाली झोपला. यावेळी ठामपा प्रशासनाच्या विरोधात त्यांनी घोषणाही दिल्या.
सर्व्हे क्रमांक ७८, ७९, ८० ही जागा संदीप भोईर यांच्या मालकीची असून, त्यावर आठ वर्षांपासून ठामपाकडून कचरा टाकला जात आहे. याबाबत ठाणे ठामपाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही, असे भोईर यांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त होऊन त्यांच्यासह काही ग्रामस्थांनी शुक्रवारी कचरा टाकण्यासाठी चाललेल्या गाड्या अडवल्या. कचऱ्याची एकही गाडी भोईर यांच्या जागेत रिकामी करू देणार नाही. तसेच ठामपा जोपर्यंत ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत कचऱ्याची एकही गाडी दिव्यात येऊ देणार नाही, असा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे काही काळ रस्त्यावर कचऱ्याच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
सोमवारी घेणार बैठक
जागेच्या मालकी हक्काबाबतची खातरजमा करण्यासाठी सोमवारी बैठक घेऊन त्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती ठामपाच्या एका अधिकाऱ्याने तसेच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिली.
-------------