अर्थसंकल्पावरील महासभा एकाच दिवसात गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:20 AM2019-08-02T01:20:01+5:302019-08-02T01:20:39+5:30

७० टक्के निधी खर्च : चर्चेस सदस्यांचा विरोध

The General Assembly on the budget was wrapped up in one day | अर्थसंकल्पावरील महासभा एकाच दिवसात गुंडाळली

अर्थसंकल्पावरील महासभा एकाच दिवसात गुंडाळली

Next

ठाणे : आधीच आयुक्तांनी सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकानुसारच शहरात कामे सुरू असल्याने त्यानुसार तब्बल ७० टक्क्यांहून अधिकचे बजेट खर्च झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरील महासभेत बोलायचे तरी काय, असा पेच नगरसेवकांना पडला होता. शिवाय, मोठमोठे प्रकल्प राबवण्याऐवजी मूलभूत सोयीसुविधांकडेही लक्ष द्यावे, अशा काही सूचना करून महापालिकेच्या इतिहासात एकाच दिवसात अर्थसंकल्पावरील महासभा गुंडाळण्यात आली.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २० फेब्रुवारी रोजी ३८६१.८८ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, स्थायी समितीचे गणित विस्कटल्याने त्यावर चर्चाच अद्यापपर्यंत झालेली नाही. अर्थसंकल्प मंजूर होत नसल्याने नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी तसेच इतर कामांवर गदा येत होती. अखेर, स्थायी समिती गठीत नसल्याने अर्थसंकल्पावरील चर्चा पुन्हा एकदा थेट महासभेत घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, येत्या ३० आणि ३१ जुलै रोजी या अर्थसंकल्पावर चर्चा ठेवली होती. परंतु, प्रत्यक्षात फेब्रुवारीमध्ये मूळ अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आतापर्यंत आयुक्तांच्या बजेटनुसारच शहरात कामे सुरू होती. त्यानुसार, लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी आतापर्यंत किती बजेट खर्च झाले, याची विचारणा केल्यावर तब्बल ७० टक्के बजेट खर्च झाल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे अर्थसंकल्पावर चर्चाच कशाला करायची, असा सवाल करून त्यांनी यावर चर्चा करणे टाळले. नगरसेवकांची कामे करण्यासाठी निधीच शिल्लक नसेल, तर चर्चा कशाला करायची, असा सवाल त्यांनी केला आहे. दुसरीकडे ३० जुलै रोजी महासभेत चर्चा सुरू झाली आणि हाच सूर बहुतेक नगरसेवकांनी लावला. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून ज्या काही मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, त्यालाही अनेक नगरसेवकांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या विरोध केला. मोठे प्रकल्प राबवण्यापेक्षा शाळांची अवस्था सुधारण्याच्या सूचना अनेकांनी केल्या. झोपडपट्टी भागातील गटारे, पायवाटा आदींसह मूलभूत सोयीसुविधांना महत्त्व देण्याची मागणी यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. याशिवाय, शहरात महात्मा फुले यांचे स्मारक व्हावे, अशी सूचनाही त्यांनी मांडली. तर, नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळावा, या उद्देशानेच काही नगरसेवक या महासभेत हजर असल्याचे दिसून आले. निधीच नसल्यानेच अनेक नगरसेवकांनी सूचना देणेही टाळले. तर, काहींनी सूचनांसह अर्थसंकल्प मंजूर केला. परंतु, या सूचना कोणत्या ते मात्र समजू शकलेले नाही.

भुवया उंचावल्या
यापूर्वी अर्थसंकल्पावरील महासभा या दोन ते चारचार दिवस चालायच्या. कधीकधी तर पहाटेपर्यंत महासभा सुरू राहत होत्या. यंदा मात्र अवघ्या एका दिवसात महासभा गुंडाळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ जुलै रोजी गटारी असल्यानेच ही महासभा एका दिवसात गुंडाळल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
 

Web Title: The General Assembly on the budget was wrapped up in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.