डोंबिवली : काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या बैठकीनंतर केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीनेही स्वबळाचा नारा दिला आहे. मनपाच्या सर्व प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना रविवारी दिला.
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहेत. रविवारी कल्याण पश्चिमेतील रामदासवाडीत पार पडलेल्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी नुकतीच जिल्हा निरीक्षकपदी नियुक्त केलेले स्थानिक नेते प्रमोद हिंदूरावदेखील उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी शहरातील स्थानिक समस्यांवरही प्रहार केला. बीएसयूपीतील घरे नागरिकांना मिळालेली नाहीत. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. अनेक भागांमध्ये स्वच्छता होत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
-------------------------------
शिवसेनेने ठेका घेतला आहे का?
आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. परंतु विकासकामांचे फलक कोणाचे लागतात, तर फक्त शिवसेनेचे. शिवसेनेने काय ठेका घेतला आहे का? विकास कामांच्या बाबतीत आपण स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. आपली कामे निदर्शनास आणून ती करून घेतली पाहिजेत. आपण केलेल्या विकासकामांचे बॅनर शहरभर लागले गेले पाहिजेत, असे मत प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केले.
-----------------------------