घोडबंदर मार्गाची वाहतुक कोंडीतून होणार सुटका, शासनाने दिला उन्नत मार्गाला ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:27 PM2017-11-29T17:27:48+5:302017-11-29T17:33:53+5:30
घोडबंदर भागाची वाहतुक कोंडी आता सुटणार आहे. शासनाने या मार्गावर उन्नत मार्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार या मार्गासाठी ६६७.३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
ठाणे - ठाणे शहरातून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग घोडबंदर पट्टा हा चारपदरी असल्याने या भागामध्ये वाहनांना मोठ्या कोंडीला सामोर जावे लागत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्यामुळे या भागामध्ये जमीन अधिग्रहण करून रस्ता रु ंदीकरण करणेही शक्य नव्हते. त्यामुळे या भागामध्ये उन्नत मार्ग उभारण्याच्या प्रस्तावाची मागील वर्षभर चाचणी सुरु होती. अखेर या ठिकाणी उन्नत मार्ग सुरु करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. या मार्गामुळे येथील वाहतुक कोंडी दुर होण्यास मदत होणार आहे. या मार्गासाठी ६६७.३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या महामार्गाविषयीचे काम केले जाणार असून हा प्रकल्प संकल्पन-वित्त पुरवठा-बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (डीएफबीओटी) तत्वावर बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूरबावडी ते गायमुख मार्गावर हा रस्ता होणार आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून घोडबंदर रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात आले असून डिसेंबर २००२ साली हे काम पुर्ण झाले होते. परंतु या महामार्गावरील गायमुखच्या दिशेकडील रस्त्याचे चार पदरीकरण करण्यात आले नसल्याने येथे नेहमीच वाहतुक कोंडी होत असते. नवी मुंबईकडून येणारी अवजड वाहने आणि कंटनेर रस्त्यात बंद पडल्यास अथवा अपघात घडल्यास या महामार्गावर पर्यायी रस्ता नसल्याने वाहन चालकांना तासनतास ताटकळत राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे. वाहतुक कोंडीचे हे प्रमाण वाढत असताना या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. परंतु रस्त्याच्या दुतर्फा झालेले नागरीकरण आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानाचा भाग या रस्त्याच्या लगत असल्याने रस्ता रुंद करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या भागामध्ये उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता. त्या संदर्भामध्ये २४ नोव्हेंबर रोजी निर्णय घेण्यात आला असून या भागात ४.४ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संकल्प-वित्तपुरवाठ-बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या संदर्भातील कार्यवाही करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाटी ६६७. ३७ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.