मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील गुंडांना पोलिसांचा दरारा हवा- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:42 PM2020-10-01T15:42:44+5:302020-10-01T15:50:24+5:30
mira bhyander, vasai-virar police station E-opening सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी आज गुरुवारी आयुक्तालयाच्या ई उद्घाटन प्रसंगी केले.
मीरा रोड - मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पहिल्या दिवसापासूनच गुंडांना पोलिसांचा दरारा हवा. गुंडांची दहशत मोडून काढा. जनतेला धीर द्या, रक्षण करा. त्यांच्या सोबत मैत्रीचे नाते हवे. आयुक्तालय छोटे असले तरी येथे काम मोठे आहे. ह्या पोलीस आयुक्तालयाकडून राज्यानेच नव्हे देशाने शिकावं, असा आदर्श घालून द्यावा. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी आज गुरुवारी आयुक्तालयाच्या ई उद्घाटन प्रसंगी केले.
परदेशात लोक पोलिसांना वचकून असतात. पोलीस दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व असते. त्यामुळे गाडी पार्किंग करतानासुद्धा लोक विचार करतात. पोलिसांचे अस्तित्व जाणवणे महत्त्वाचे आहे. गुंडाना भीती हवी. नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज लागू नये हे यशस्वी पोलीस आयुक्तालयाचे गमक मानतो. गुंडागर्दीवर वचक बसेल असे काम करा. बाळासाहेब म्हणायचे पोलिसांचा दरारा हवा.
मीरा-भाईंदरमध्ये नेमका बंदोबस्त कोणाचा करायला पाहिजे हे उघड गुपित आहे. आमदार गीता जैन व प्रताप सरनाईकना माहिती आहे. पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दातेंसारखे कर्तव्य कठोर, स्वच्छ अधिकारी दिला आहे . २६/११च्या हल्ल्यात त्यांनी देखील अतिरेक्यांशी सामना केला होता. फार मोठी जबाबदारी दातेंवर विश्वासाने सोपवली आहे. ते चांगला पायंडा पडून देतील असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना सोबत पोलीस लढत आहेत. पोलिसांची नियमित आरोग्य तपासणी, चाचणी करण्याची शिस्त लावा. मी घरा बाहेर पडत नाही म्हणून माझ्यावर टीका होते. पण काम होण्याला महत्त्व आहे. प्रत्येकाची कामाची पद्धत असते. पण पोलिसांना वर्क फ्रॉम होम करता येत नाही. त्यांना जीवाची व घरादाराची पर्वा न करता काम करावे लागतेय. उत्तर प्रदेशात जे हाथरस प्रकरण घडले ते राज्यात सहन केले जाणार नाही. राज्यात कोणी वाकड्या नजरेने देखील मुली-महिलांकडे बघायची हिंमत केली नाही पाहिजे, असा वाचक हवा असे मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, ह्या आयुक्तालयाचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता पण तो कागदावरच होता. आयुक्तालयाच्या भागात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या जेणेकरून कार्यक्षमता वाढण्याचा अनुभव आहे. मुंबई-ठाण्यातील वाढत्या लोकसंख्येचा भार ह्या दोन्ही शहरांवर आहे. येथील सागरी सुरक्षा महत्वाची आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक ओढाताण असली तरी निधीची काळजी करू नका. कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याचा विचार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली. दाते हे जिगरबाज अधिकारी असून कायदा सुव्यवस्था चांगली राखली जाईल असा विश्वास आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी होतील.
राज्याला पोलिसांवर अभिमान असून महाराष्ट्र पोलीस देशातील नंबर एकचे पोलीस आहे. त्यामुळे बाहेरून येऊन कोणी काय बोलत असेल तर त्या कडे गांभीर्याने बघू नका, असा टोला उपमुख्यमंत्र्यांनी कंगना रानौतचे नाव न घेता लगावला. प्रत्येक संकटात पोलिसांनी प्राणाचे बलिदान दिले आहे. राज्यातील जनता पोलिसांचा त्याग कधी विसरणार नाही. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मीरा भाईंदर - आणि वसई विरारमधील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आज हे पोलीस आयुक्तालय सुरू करून महाविकास आघाडी सरकारने पूर्ण केली आहे. दातेंसारखे नावलौकिक असलेले अधिकारी दिले आहेत. आयुक्तालयाच्या एकूणच व्यवस्थेसाठी सुमारे २५ कोटींची गरज आहे. आयुक्तालयास मनुष्यबळ लागल्यास ते वाढवून देऊ.
पोलीस आयुक्त सदानंद दाते म्हणाले की, सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे गतिमान, कामात निष्णात, संवेदनशील, उपक्रमशील अशी चांगली पोलीस कामगिरी करण्याचा प्रयत्न मी आणि सर्व सहकारी करू. विविध आव्हानांचा सामना करण्याची उमेद असून आम्ही नव्या आयुक्तालयाची आत्मविश्वासाने घडी बसवू. गेले काही आठवडे आपण आयुक्तालयातील गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न, वाहतूक व्यवस्था, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती व प्रशासकीय कामांचा आणि एकूणच आव्हानांचा आढावा घेतला आहे. करायच्या कामांचा आराखडा आणि त्याचा प्राधान्यक्रम बनवला आहे. त्यावर निश्चित लवकरच काम सुरू करू. देश आणि समाजासाठी अविरत कंकरण्याची साहसाची, पराक्रमाची संस्कृती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलेली आहे त्याच्याशी प्रामाणिक राहू अशी ग्वाही दाते ह्यांनी दिली. या ऑनलाइन उदघाटन प्रसंगी पालघरचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील , पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आदींसह खासदार, आमदार, महापौर , पालिका आयुक्त , अधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते. प्रत्येक पोलीस ठाण्यात देखील स्क्रीन लावून उद्घाटनाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात देखील प्रतिष्ठित नागरिक आदी जमले होते.