अजित मांडके -
ठाणे : कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलॅन्डच्या जागेवरुन दोनही राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैºया उडत आहेत. आव्हाडांनी या मैदानाला लावण्यात आलेल्या टाळ्याच्या मुद्यावरुन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील आव्हाडांना प्रतिउत्तर देत खेळाच्या मैदानासाठी लहान मुलांचा वापर करुन आव्हाड राजकारण खेळत असल्याचा आरोप नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यातही शासनाच्या या मैदानाच्या जागेतून लाखोंची लुट केली जात असून शासनाला एकही पैसा भरला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता हे मैदाना राजकीय आखाडा झाल्याचेच दिसत आहे.
खारेगाव येथील खारलॅन्ड वरील मैदानाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टाळे ठोकण्यात आल्यानंतर त्याचा जाब आव्हांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मैदानाला टाळे ठोकण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका असा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाने पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांना प्रतिउत्तर दिले आहे. हे मैदान शासकीय मालकीचे आहे, ते कार्यक्रमाला घेतले त्यावेळेस आम्ही ३४ हजार मोजले होते. परंतु मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, आव्हाडांच्या गुंडांनी अडविल्याचा दावाही परांजपे यांनी केला. परंतु मागील ८ वर्षापासून या मैदानाचा वापर सुरु असून त्यातून लाखोंचा मलिदा लाटला जात आहे. मात्र शासनाला एक दमडीली दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात येथील क्रिकेट बंद करणे ही आमची भावना नसून येथील सर्वच मुलांना या मैदानाचा वापर करण्यास मिळावा अशी आमची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. त्यातही या मैदानाच्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावे अशी इच्छा आव्हाडांचीच होती. परंतु त्याची अंमलबजावणी त्यांनीच केली नसल्याचा दावा नजीब मुल्ला यांनी केला. येथील अनिरुध्द अॅकेडमी पैसे घेते का नाही? ते आव्हाडांनी आधी स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी दिले. सहानभुती मिळविण्याची अॅक्टींग बंद करा, आता जनता तुमच्या अॅक्टींगला बळी पडणार नसल्याचेही ते म्हणाले. त्यातही या मैदानात राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम करुन दिले जात नसून शासकीय मैदान हडपण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सामाजिक न्याय विभागाच्या जागेवर कार्यालयखारेगाव, कावेरी सेतू येथे उभारण्यात आलेले राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय हे सामाजिक न्याय विभागाच्या जागेवर असून त्याच्या बाजूला ७५ लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेले वाचनालय देखील अनाधिकृत असल्याचा दावा परांजपे आणि मुल्ला यांनी केला आहे. तसेच कळवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्कींगच्या नावाखाली बेकायदा वसुली केली जात असून त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरेसवकाकडून ही वसुली सुरु असून या सर्वांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातही राष्ट्रवादीचे ते कार्यालय अनाधिकृत नसल्याचे आव्हाड यांनी पुढील २४ तासात जाहीर करावे तसेच ती जागा कोणाच्या मालकीची आहे ते सुध्दा जाहीर करावे असे आव्हानही परांजपे यांनी दिले.